अनन्वित छळ करून देहव्यापारातही ढकलले; माणुसकीला काळिमा फासणारी निंदनीय घटना

नागपूर : थकलेले घरभाडे व पतीच्या आजारासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एका असहाय महिलेवर घरमालकाने बलात्कार केला. इतकेच नाही तर एका दुसऱ्या महिलेच्या मदतीने अनन्वित छळ करून तिला देहव्यापारातही ढकलले. माणुसकीला काळिमा फासणारी ही निंदनीय घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली.

माणिक रामचंद्र नेवारे (५३) रा. लष्करीबाग आणि आशा भूषण शर्मा (५०) अशी आरोपींची नावे असून माणिक याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आशा फरार आहे.

पीडित महिला आरोपीच्या घरी भाडय़ाने राहायची. तिचा पती मजुरी करतो. तिला आठ वर्षांचा मुलगा व सात वर्षांची एक मुलगी आहे. घरमालक नेवारे हा महापालिकेत मोहरीर पदावर कार्यरत आहे. मे-२०१८ मध्ये तो भाडे मागण्यासाठी पीडितेच्या घरी आला. त्यावेळी तिचा पती कामावर गेला होता व मुले खेळायला गेली होती. सध्या पैसे नसून काही दिवसांत भाडे देण्याचे आश्वासन तिने दिले. मात्र, नेवारे ऐकत नव्हता. ती गयावया करू लागली. शेवटी त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार करून भाडे वेळेत न दिल्यास पुन्हा असे करण्याची धमकी दिली. त्याच्याविरुद्ध तक्रार दिली तर घराबाहेर काढेल या भीतीने ती शांत बसली. काही दिवसांत तिने घरभाडे दिले. त्यानंतरही तो वारंवार तिच्यावर अत्याचार करू लागला. दरम्यान, पीडित महिलेचा पती आजारी पडला. त्याच्या उपचाराकरिता पैशांची गरज होती. त्यावेळी नेवारेने शेजारी राहणाऱ्या आशासोबत तिची ओळख करून दिली. दरम्यान, आशाने तिला एका व्यक्तीकडून २५ हजार रुपये उधार घेऊन दिले. त्याची परतफेड करण्यासाठी पीडितेवर ती दबाव टाकू लागली. तिने परतफेड करण्यास असमर्थता दर्शवली असता तिने तिला देहव्यापारात ढकलले. आशा ग्राहक शोधायची. त्या ग्राहकांकडे पीडितेला पाठवायची. ग्राहकांकडून ३ ते ४ हजार रुपये घ्यायची व पीडितेला एका ग्राहकामागे ५०० रुपये द्यायची. २५ हजारांचे कर्ज फेडण्यासाठी आरोपी तिच्यावर अनन्वित अत्याचार करू लागले. शिवाय नेवारे हा वाट्टेल तेव्हा तिच्यावर अत्याचार करायचा. सीताबर्डीतील अनेक लॉजवरही तो तिला घेऊन गेला. काही दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर तिच्या पतीने व तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नेवारे यास अटक केली, तर महिलेचा शोध सुरू आहे.

नसबंदीनंतरही गर्भवती राहिल्याने धक्का

काही दिवसांपासून पीडित महिला तणावात होती. पतीने तिला विचारले असता ती आणखी घाबरली. दरम्यान, तिची प्रकृती खराब झाली. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरने ती गर्भवती असल्याचे सांगितले. पतीने आपण दोन वर्षांपूर्वी नसबंदी केली असून गर्भधारणा कशी झाली, असा सवाल पीडित महिलेला केला. तेव्हा तिने सर्व प्रकार सांगितला.