रॅगिंगचा प्रकार असल्याची चर्चा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) जीवरसायनशास्त्र विभागातील एका महिला निवासी डॉक्टरने वरिष्ठ डॉक्टर गेल्या चार महिन्यांपासून मानसिक त्रास देण्यासह छेड काढत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. हा रॅगिंगसारखा प्रकार असतानाही प्रशासनाने अद्याप चौकशीही सुरू केलेली नाही. त्यामुळे हा प्रकार दाबला जात आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जीवरसायनशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या तीन जागा आहेत. गेल्यावर्षी या जागेवर एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नव्हता, परंतु यंदा तीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.  हे विद्यार्थी शिक्षण कालावधीत निवासी डॉक्टर म्हणून मेडिकलमध्ये काम करतात. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांवर प्रथम वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हे गंभीर आरोप लावले आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार  हा वरिष्ठ सहकारी  गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाईट भाषेचा वापर करून हिनवतो, इतरासमोर अश्लील हावभाव करतो. जबरदस्तीने जास्त काळ डय़ुटी लावण्यासह अन्य पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्रास वाढल्यावर शेवटी हा प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मेडिकल गाठत जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भालचंद्र मुरार यांची भेट घेतली. तसेच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे लेखी तक्रारही केली. त्यानंतर अधिष्ठात्यांनी विभागप्रमुखांना तातडीने या गंभीर प्रकरणात लक्ष घालण्याचे सूचित केले, परंतु त्यानंतर काहीही झाले नसल्यामुळे प्रशासनाकडून हा रॅगिंगसारखा प्रकार दाबण्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न उपस्थित  होत आहे. या प्रकरणामुळे मेडिकलच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी मेडिकलच्या एका विभागप्रमुखांवरही एका विद्यार्थिनीने गंभीर आरोप केले होते. त्यावरून या अधिकाऱ्याची बदली झाली होती, हे विशेष.

‘‘विद्यार्थिनीने रॅगिंगची नव्हे तर वरिष्ठ विद्यार्थी त्रास देत असल्याची तक्रार प्रशासनाला दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सरू आहे. त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल. मेडिकलला शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी प्रशासनाकडून घेतली जाते. हे प्रकरण दाबण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.