News Flash

विदर्भात महिलांच्या ‘अबोली’ ऑटोरिक्षांचा पत्ताच नाही!

महिलांना गुलाबी रंगाच्या ऑटोरिक्षा दिल्या जाणार असल्याचे संकेत फेब्रुवारी-२०१६ला दिले होते.

परिवहन मंत्र्यांच्या योजनेला अधिकाऱ्यांकडूनच हरताळ

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील महिलांकरिता ऑटोरिक्षांचे रंग अबोली करण्याचा निर्णय घेऊन तशी कायद्यात सुधारणा केली. परंतु मुंबईसह इतर काही शहरे वगळता महिला चालकांकडे या रंगाचे ऑटोरिक्षाच दिसत नाहीत. विदर्भात एकाही परवाना असलेल्या महिलेला अद्याप या रंगाचा ऑटोरिक्षा वापरता येत नसून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यात रस नसल्याचे चित्र दिसत आहे. या चित्रामुळे परिवहन मंत्र्यांच्या योजनेला अधिकाऱ्यांनीच हरताळ फासल्याचे दिसत आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून महिलांच्या अबोली ऑटोरिक्षाच्या योजनेकडे बघितले जाते. त्याला कायद्याचा आधार देण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून २७ जून २०१६ ला मोटर वाहन कायद्यात सुधारणा करून तसा अध्यादेश काढला. नागपूर शहरात १५ महिलांना ऑटोरिक्षाचे नवीन परवाने दिल्याने  त्यांना या रंगाचे ऑटोरिक्षा मिळून ते रस्त्यावर चालण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु नागपूरसह विदर्भाच्या एकाही जिल्ह्य़ात अद्याप महिलांना अबोली रंगाचे ऑटोरिक्षाच दिले नसल्याचे चित्र आहे. यात प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना रस नाही काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महिलांना गुलाबी रंगाच्या ऑटोरिक्षा दिल्या जाणार असल्याचे संकेत फेब्रुवारी-२०१६ला दिले होते. त्याला कायदेशीर आधार देण्याकरिता मोटार वाहन कायद्यानुसार शासनाने एप्रिल- २०१६ मध्ये प्राथमिक मसुदा जाहीर करीत राज्यातील सगळ्याच प्रादेशिक परिवहन कार्यालयांना तो पाठवला होता. त्यात महिलांकरिता प्रस्तावित ऑटोरिक्षाच्या छताला पिवळा तर इतर भागाला अबोली रंग असणार असल्याचे सांगण्यात आले होते. या रंगात कुणाला आक्षेप असल्यास नियमानुसार तो नागपूरकरांना शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३० एप्रिलपर्यंत नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

राज्यातील इतरही प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेनंतर आक्षेप असलेल्या नागरिकांच्या विषयांवर वेगवेगळ्या भागात सुनावणी घेण्यात आली. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यास मोटार वाहन कायद्यानुसार राज्यातील सगळ्या महिलांकरिता नियमानुसार ऑटोरिक्षांचा रंग अबोली निश्चित केला होता. या प्रक्रियेला पाच महिने लोटल्यावरही अद्याप मुंबई व औरंगाबाद वगळता इतरत्र या रंगाचा ऑटोरिक्षाच दिसत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. तेव्हा परिवहन मंत्र्यांच्या योजनेला अधिकाऱ्यांनी हरताळ फासला काय? हा प्रश्न नागरिक विचारत आहे. उपराजधानीत महिलांना सुमारे १५ नवीन ऑटोरिक्षा परवाने मंजूर झाले होते. पैकी ते घेणाऱ्या सगळ्याच महिलांनी काळे, पिवळ्या रंगाचाच ऑटोरिक्षा घेतल्याची माहिती असून अधिकाऱ्यांनी त्यांना अबोली रंगाकरिता प्रोत्साहितही केले नाही, हे विशेष.

ऑटोरिक्षा चालकाने एकदा प्रवासी घेतल्यानंतर त्यांना शहरातील कोणत्याही भागात सोडावे लागले. नागरिकांचा वावर नसलेल्या भागात प्रवासी सोडल्यावर गुलाबी रंगाचा ऑटोरिक्षात महिला चालक असल्याचे माहीत असल्याने असामाजिक तत्त्वांकडून त्यांच्या सुरक्षिततेला धोका संभावतो. सोबत ऑटोरिक्षांच्या किमती वाढल्याने व शासनाकडून ऑटोरिक्षा महिलांनीच चालवण्याची सक्ती असल्याने ८ ते १० तासानंतर भाडय़ाने न देता उभा ठेवणे कुणालाही परवडणारे नाही. त्यामुळे विदर्भात अद्याप एकाही महिलेने या रंगाचा ऑटोरिक्षा घेतला नाही. अधिकाऱ्यांनाही या ऑटोरिक्षाबाबत फारसी माहिती नसल्याचे चित्र आहे.

– विलास भालेकर ,

अध्यक्ष, विदर्भ ऑटोरिक्षा चालक मालक संघटना, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:35 am

Web Title: women aboli auto rickshaw not seen in vidarbha
Next Stories
1 जल, वायू प्रदूषणामुळे ‘ओडोनाटा’ प्रजाती संकटात
2 गुणवत्ता वाढीची जबाबदारी शैक्षणिक संस्थावर – गडकरी
3 ‘वाचन रुची वाढवण्यासाठी ऑडिओ बुक चांगला पर्याय’