टिमकीतील हृदयद्रावक घटना
पती आणि मुलाचा गळा चिरून एका महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना टिमकी भागात शुक्रवारी उघडकीस आली. मृत कुटुंब हे कानपूर येथील असून, गेल्या आठ महिन्यांपासून ते नागपुरात भाडय़ाने राहत होते.
मृत मोहंमद अली मोहंमद हारुण (३५) हा सर्वर आलम या नावाने ओळखला जात होता. मृत मुलाला दादू (५) नावाने ओळखण्यात येत होते. मृत महिलेचे (३०) नाव समजू शकले नाही. सर्वर आलम हा कापडांवर जरीकाम करण्याचे काम करायचा. त्याची पत्नी गृहिणी होती. या कुटुंबाविषयी कुणाकडेच सविस्तर माहिती नाही. हे कुटुंब मूळचे कानपूरचे असल्याचे सांगण्यात येते. आठ महिन्यांपूर्वी ते नागपुरात आले.
तहसील पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील टिमकी परिसरात ‘बॉम्बे चिकन’ व्यवसायाचे मालक मोहंमद नासीर यांच्या अल अजरा एम्पायर या इमारतीत पहिल्या माळ्यावर हे कुटुंब भाडय़ाने राहत होते. सर्वर हा घरीच जरीकाम करायचा.
काल, गुरुवारी रात्री नासीर यांच्या घरी साखरपुडय़ाचा कार्यक्रम होता. सर्वर आलम राहत असलेल्या खोलीच्या बाजूलाच हा कार्यक्रम झाला. पहाटे २ पर्यंत सर्वर जागा होता. कार्यक्रमादरम्यान सर्वरची पत्नी तणावात असल्याप्रमाणे येरझारा मारत होती.
शुक्रवारी दुपारी २ वाजता एक व्यक्ती सिलिंडर घेण्यासाठी आला. त्याने सर्वर आलम यांचे दार ठोठावल्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याने मोहंमद नासीर यांच्या कुटुंबातील एका मुलाला ही माहिती दिली. घराच्या दुसऱ्या माळ्यावरून डोकावून बघितल्यावर महिलेने छताला नॉयलॉनच्या दोराने गळफास घेतल्यास दिसले.
त्यानंतर पोलिसांना माहिती देताच ते घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांना चटईवर मुलगा आणि पती गळा कापलेल्या स्थितीत आढळले. शेजारी ‘जल्लाद’ नावाच्या विषाची बाटली पडलेली होती. महिलेने पती व मुलाचा गळा चिरून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.
व्हीडिओ शूटिंग
घटनास्थळावर पोलिसांनी एक रजिस्टर आणि मोबाईलमध्ये व्हीडिओ शूटिंग आढळले. या व्हीडिओ शूटिंगमध्ये पती-पत्नी दोघांनीही आत्महत्या करीत असल्याचे कबूल केले आहे, तर रजिस्टरमध्ये आत्महत्या करीत असून, यासाठी कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे लिहून ठेवले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 1:31 am