News Flash

महिलांनी डोक्यावर पदर घेणे आवश्यक नाही!

नागपूरकर अनुराग आणि कामठी येथील रहिवासी सरिता (नावे बदललेली) २१ जून १९९५ ला विवाह झाला.

nagpur court
नागपूर खंडपीठ

 

कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढून ठेवणे घटस्फोटाची कारणे होऊ शकत नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

एकविसाव्या शतकात लग्नानंतर महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा, अशी अपेक्षा करता येऊ शकत नाही. त्याशिवाय कपाळावरचे कुंकू पुसणे किंवा मंगळसूत्र काढून ठेवल्याने महिला क्रूर असल्याचे सिद्ध होत नसून ते घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कौटुंबिक खटल्यात नोंदविले आहे. हा निकाल पुरुषप्रधान संस्कृतीला मोठी चपराक देणारा आहे.

नागपूरकर अनुराग आणि कामठी येथील रहिवासी सरिता (नावे बदललेली) २१ जून १९९५ ला विवाह झाला. त्यानंतर चौदा महिन्यांनी त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर त्याने नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता तो सरिताला तिच्या माहेरून दीड लाख रुपये  घेऊन येण्यासाठी दबाव टाकत होता. माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने तिचा छळ केला. २ ऑक्टोबर २००० मध्ये त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्याने हात धरून तिला घराबाहेर काढले. त्या दिवशी रात्री २ वाजेपर्यंत ती घराबाहेर रस्त्यावर उभी होती. परंतु अनुराग तिला परत घ्यायला आला नाही. तिने त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. परंतु तेही तिच्या मदतीला आले नाही. शेवटी ती बहीण व जावयाच्या मदतीने माहेरी परतली. त्यानंतर तिने सासरी परतण्याचा प्रयत्न केला असता तिला घरात प्रवेश देण्यात आला नाही.

दरम्यान, अनुरागने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. ही याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली. त्याविरुद्ध  उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलावर न्या. वासंती नाईक आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अनुरागने सरिता ही घरात डोक्यावर पदर घेत नाही, कपाळाचे कुंकू पुसून टाकते आणि मंगळसूत्रही काढून ठेवते. तिचे हे वागणे अतिशय क्रूर असून तिला हटकले असता तिने नवऱ्याचे घर सोडले आणि कधीच परतली नाही, असे आरोप केले. मात्र, नवऱ्याने केलेल्या आरोपांच्या आधारावर घटस्फोट देता येऊ शकत नाही. शिवाय नवऱ्यानेच तिला घराबाहेर हाकलून लावले, असे तिने सिद्ध केले असल्याचे मत नोंदवित न्यायालयाने अनुरागला घटस्फोट नाकारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 2:21 am

Web Title: women issue after marriage
Next Stories
1 वर्षांत धान पट्टय़ातील ३१ हजार हेक्टर सिंचनाखाली येणार
2 नैराश्य आलेल्या युवकांसाठी महापालिकेने ‘कौन्सिलिंग सेंटर’ची निर्मिती करावी
3 लोहमार्ग पोलीस भरतीतील २० टक्के उमेदवार पदव्युत्तर
Just Now!
X