अप-डाऊन करणारे चाकरमाने नेहमीप्रमाणे इटारसी पॅसेंजर पकडायला बुधवारी सकाळी पावणेआठ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. गाडी फलाट क्रमांक ४ वर येताच सर्वच अवाक् झाले.. तिकीट तपासणीस.. चालक.. स्थानक उपप्रबंधक.. आणि सिग्नल.. सर्वपातळीवरील यंत्रणा सांभाळणाऱ्या महिलाच होत्या. शतप्रतिशत महिलांची गाडी.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नागपूर रेल्वेस्थानकावरून सुटणारी इटारसी पॅसेंजर गाडीशी संबंधित सर्व कर्मचारी महिलाच राहतील, अशी व्यवस्था केली होती. रेल्वे इंजिन चालक, सहायक चालक, गार्ड, तिकीट तपासणीस, उप स्टेशन व्यवस्थापक, पाईन्ट्सन एवढेच नव्हे तर फलाटावरील साफसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य निरीक्षक देखील महिलांनाच नियुक्त करण्यात आले होते.

गाडी क्रमांक ५१८२९ नागपूर-इटारसी पॅसेंजर या गाडीचे परिचालन महिला रेल्वे कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. या पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलट माधुरी उराडे आणि सहायक लोको पायलट प्रतिमा कुमारी होत्या. रेल्वे गाडीचा सर्वात शेवटचा डबा असतो रेल्वे गार्डसाठी. रेल्वे गार्डची जबाबदारी गाडीवर लक्ष ठेवण्याची असते. स्वाती पाटील यांनी ही जबाबदारी योग्यरेल्वे गाडीचा सर्वात शेवटचा डबा असतो रेल्वे गार्डसाठी.रित्या पार पाडली. १३ डबे असलेल्या या गाडीत पाच महिला तिकीट तपासणीस नेमण्यात आल्या होत्या. यामध्ये श्रीमती व्ही.आर. देसाई, शालिनी मीना, छाया गार्गे, अनुश्री पराशर आणि ममता राव यांचा समावेश होता. इटारसी पॅसेंजर रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्याचे काम देखील महिला कर्मचाऱ्यांनी केले. रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी उप स्टेशन व्यवस्थापक दीपाली मानकरे यांच्यासोबत पाईन्ट्समन माधुरी पाठक हजर होत्या. रेल्वेगाडीला ‘आरआरआय कॅबिन’मधून सिग्नल देण्याचे काम देखील एका महिला पॅनल ऑपरेटरने केले. पॅनल ऑपरेटर अनघा मेश्राम यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. नागपूर रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक४ वरून ही गाडी सोडण्यात आली. या फलाटाची साफसफाईची जबाबदारी देखील महिला आरोग्य निरीक्षक यांच्याकडे देण्यात आली होती.

मालगाडी चालवण्याचा २३ वर्षे अनुभव असलेल्या माधुरी उराडे यांना पहिल्यांदाच प्रवासी गाडी (इटारसी पॅसेंजर) चालवण्याची संधी देण्यात आली. तसेच १२ वर्षांच्या मालगाडी चालवण्याचा अनुभव असलेल्या सहायक चालक प्रतिमा कुमारी यांना त्यांच्या मदतीला देण्यात आले होते. या दोन्ही चालकांनी इटारसी पॅसेंजर गाडी अतिशय सुरळीतपणे गंतव्य ठिकाणी पोहोचवून ‘हम भी किसीसे कम नही’ याची पुन्हा प्रचिती दिली. आमला पॅसेंजरमध्ये प्रवासी जरी पुरुष-महिला असले तरी कर्मचारी मात्र केवळ महिलाच होत्या.

‘माधुरी उराडे अनुभवी लोको पायलट असल्याने त्यांना प्रवासी गाडी चालवण्याची संधी देण्यात आली. मध्य रेल्वेतील नागपूर विभागातील हा पहिला प्रयोग आहे. उराडे या प्रवासी गाडी चालवण्यास पात्र ठरल्याने त्यांना भविष्यात नियमित प्रवासी गाडी चालवण्याची संधी मिळेल.’

प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे