News Flash

गाडी चालवण्यापर्यंतची सर्व सूत्रे महिलांच्या हाती

रेल्वेतील स्री शक्तीने इतिहास रचला

नागपूर रेल्वेस्थानकावरून नागपूर-भुसावळ इंटरसिटी महिला स्पेशल सोडण्यात आली. त्यावेळी एकत्र आलेले कर्मचारी   (लोकसत्ता छायाचित्र) 

रेल्वेतील स्री शक्तीने इतिहास रचला; विदर्भ एक्सप्रेस आणि नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस महिलांनी सांभाळली

आपण कर्तृत्वात कुठेही मागे नाही, हे महिलांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. रेल्वेतही त्यांनी स्वबळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. याचा प्रत्यय महिला दिनी आला. या दिवशी राज्याच्या उपराजधानीतील रेल्वेची सूत्रे त्यांनी समर्थपणे सांभाळली. अजनी रेल्वेस्थानकाचे संपूर्ण व्यवस्थापन त्यांनी सांभाळले. महिलाद्वारे संचालित मध्य रेल्वेतील दुसरे आणि देशातील तिसरे रेल्वेस्थानक ठरले. त्यासोबतच इतवारी रेल्वेस्थानक संचालन आज दिवसभर त्यांच्याकडे होते. विदर्भ एक्सप्रेस आणि नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस महिलांनी सांभाळली. यामुळे आज खऱ्या अर्थाने नागपूर रेल्वेवर ‘महिला राज’ होते.

मध्य रेल्वेचे व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर नागपूर ते भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेसला हिरवी झेंडीा दाखवली आणि अजनी रेल्वेस्थानकाचे संचालन महिला कर्मचाऱ्यांच्या हाती दिले. त्यांनी सांकेतिक किल्ली रेल्वे स्थानक व्यवस्थापक माधुरी चौधरी यांच्याकडे सोपवली.

रेल्वेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण होता. यापुढे अजनी रेल्वेस्थानकाचे संचालन पूर्णपणे महिला कर्मचारी करणार आहेत.

मध्य रेल्वेत माटुंगा आणि अजनी येथे महिला कर्मचारी आजपासून राहणार आहे, तर राजस्थानमध्ये एका रेल्वेस्थानकावर अशी व्यवस्था आहे. पूर्णपणे महिलांकडून चालवण्यात येणारे अजनी हे देशातील तिसरे स्थानक ठरले आहे. या स्थानकावर ३६ महिला कर्मचाऱ्यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

अजनी स्थानकावर दररोज सुमारे सहा हजार १०० प्रवासी ये-जा करतात.

या स्थानकाला सॅटेलाईट टर्मिनस म्हणून विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. येथे दररोज २६ गाडय़ांची ये-जा असते. याशिवाय अजनी येथून लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्लासाठी गाडी सोडण्यात येते.

या रेल्वेस्थानकावर आज स्टेशन व्यवस्थापक, तिकीट तपासणी, उद्घोषणा, पाईन्ट्समन (रुळ बदलणारे) आणि तिकीट विक्री आदी जबाबदाऱ्या महिलाच सांभाळणार आहेत.

अजनी येथे एक स्टेशन मास्टर, सहा तिकीट विक्री कर्मचारी, चार तिकीट तपासणीस, चार पार्सल पोर्टर आणि आरपीएफ कर्मचारी, पाईन्ट्सन आणि सफाई कर्मचारी मिळून ३६ कर्मचारी आहेत. इतवारी रेल्वेस्थानकावर आज महिलांचेच राज्य होते. या स्थानकाचे संचालन दिवसभर त्यांनी सांभाळले.

इंटरसिटीतही महिलांचा बोलबाला

महिला कर्मचाऱ्यांनी नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस सक्षमपणे संचालित केली. इंजिन चालक माधुरी उराडे, सहायक इंजिन चालक मंजू वैद्य होत्या. गार्डची भूमिका पूनम मेश्राम यांनी पार पाडली. या गाडीवर कंडक्टर वृंदा देसाई, तिकीट तपासणीस शालिनी मीना,  छाया गर्गे व महानंदा वाटकर होत्या. या गाडीला हिवरी झेंडी उप स्टेशन प्रबंधक दीपाली मानकरे दाखवली यावेळी अनगा मेश्राम यांच्यासह पाईन्ट्समेन अगस्था फ्रॉन्सिस उपस्थित होते. आज ही गाडी फलाट क्रमांक एकवरून सुटली.

विदर्भ एक्स्प्रेसचीही सूत्रे

विदर्भ एक्स्प्रेसचे इंजिन चालक म्हणून सुनीता चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. या गाडीवर सहायक इंजिन चालक स्नेहा सहारे होत्या तर गार्ड्सचे कर्तव्य  कौशल्या साहू यांच्याकडे होते. तिकीट तपासणीस वंदना बनसोड, स्मिता तापस, रिना धवलकर, योगिता गायकवाड, संगीता डोंगरे होत्या. त्यांच्या पथकात एस. मेंढे, करुणा रंगारी, वैशाली टाले होत्या. गाडीवर तैनात आरपीएफ संगीता साहू, रोशनी यादव यांचा समावेश होता. गाडीत एकूण १३ महिला कर्मचारी होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2018 2:36 am

Web Title: womens day 2018 express run by women
Next Stories
1 मुन्ना यादवला सरकारचे अभय
2 लोकजागर : विद्यापीठ की अड्डा!
3 एकमेव महिला कॅब चालक निर्मला
Just Now!
X