News Flash

सेंद्रिय शेतीच्या प्रचारक प्राची माहूरकर

पुण्यातील नोकरी सोडून नागपूरजवळ काटोल मार्गावर दहा एक जमीन खरेदी करून सेंद्रिय शेती  करण्यास प्रारंभ केला.

शेती परवडत नाही म्हणून ती विकून नोकरी-व्यवसायात उतरण्याच्या काळात एका खासगी कंपनीतील सल्लागाराची नोकरीचा त्याग करून सेंद्रिय पिकांचा प्रसार व्हावा म्हणून  उच्चशिक्षित प्राची माहूरकर यांची धडपड आता आकाराला येत आहे व या पिकांच्या उत्पादनात त्यांनी बऱ्यापैकी यशही मिळवले आहे.

नोकरी आणि तीही पुण्यात ही बहुतांश उच्चशिक्षितांची आकर्षणाची गोष्ट! तेथे मनासारखी नोकरी मिळाल्यावर ती सोडण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. मात्र, मनाचा नैसर्गिक कल ज्या गोष्टीकडे होता, त्याला प्रतिसाद देत प्राची यांनी गावाकडे चला. हा महात्मा गांधींचा मूलमंत्र अंगिकारला. पुण्यातील नोकरी सोडून नागपूरजवळ काटोल मार्गावर दहा एक जमीन खरेदी करून सेंद्रिय शेती  करण्यास प्रारंभ केला.

त्यांनी गेल्या तीन वर्षांत ही शेती करून बऱ्यापैकी उत्पन्न मिळवले आहे. सोबत येथे चार एकरावर जंगल आणि एका एकरावर गवत वाढवले आहे. त्यातून निसर्गाचे संतुलन साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे गवत शेतात राबणाऱ्या जनावरांसाठी कामी येते. गेल्या अनेक वर्षांपासून देशात पीक लागवड करताना ‘मोनोक्रॉप’ पद्धतीचा वापर केला जातो. यामुळे किडीचे नियंत्रण जिकरीचे होतेच. शिवाय एखाद्या वर्षी पीक कमी मिळाले किंवा नापिकी आली तर शेतकरी उद्ध्वस्त होतो. ‘मल्टीक्रॉप’ किंवा अंतर्गत पीक घेण्याच्या नव्या पद्धतीमुळे हे शंभर टक्के टाळता येणे शक्य आहे, असे प्राची यांना अभ्यासानंतर जाणवले व त्यावर त्यांनी सातत्याने काम सुरू केले. पुण्यात नोकरी करत असताना इकॉलॉजी सोसायटीबद्दल माहिती मिळाली. त्याचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर निसर्ग, पर्यावरणाविषयीचे गैरसमज दूर झाले व त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी दोन वर्षे शेतजमीन आणि त्यावर येणारे गवत, झाडे, झुडपे, पीक याचे सखोल निरीक्षण प्राची  यांनी केले. त्यातून त्यांना जमिनीची पत लक्षात आली, तसेच येथे कोणते पीक यशस्वी होईल, याचाही अंदाज आला. आज त्या वर्षभरातून खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पिके घेतात. अंबाडी आणि झेंडूची झाडे लावून किडीचे नियंत्रण करतात. शिवाय अंबाडीपासून सरबत, लोणचे, अंबाडीच्या बियांचे बेसन आदी उत्पादन तयार करून विकतात. यातून माहूरकर यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे.

सेंद्रिय शेतीत उत्पन्न थोडे कमी येत असले  तरी जमिनीचे नुकसान होत नाही आणि वर्षांनुवर्षे त्या जमिनीतून उत्पन्न मिळत राहते. शेतीतील उत्पन्न, बाजार आणि महागाई यांचा विचार करता शेतकरी केवळ शेतीच्या भरवशावर तग धरू शकत नाही. त्याला जोडधंदा असणे आवश्यक आहे. तुरीचे पीक घेत असेल तर थेट तूर न विकता डाळ विकायची, असे जोडधंदे केल्यास आणि विक्री व्यवस्थापन शिकल्यास सेंद्रिय शेती आर्थिकदृष्टय़ा देखील फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्या व्यक्त करतात. एकच पीक घेतल्याने उत्पन्न खूप दिसते, पण आपण आपली अनेक वाणे गमावून बसतो याचे भान राहात नाही. बिजोत्सव या गटातून आम्ही बियाणांचे संवर्धन देखील करण्याचा प्रयत्न करत आहोत. शाश्वत शेतीशिवाय पर्याय नाही, असा प्राची यांचा आग्रह आहे.

पिकांवर फवारलेले रसायन आपल्या पोटात जाते आणि जमिनीत सुद्धा मुरते. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी किमान ज्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे, त्यांनी तरी सेंद्रिय शेती करावी किंवा जे सेंद्रिय शेती करत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहावे. त्यामुळे आपल्या ताटात रसायनमुक्त अन्न पडण्यास मदत होईल, असेही प्राची माहूरकर म्हणाल्या. एक महिला असूनही अशा पद्धतीची शेती करण्यास कोणतीही अडचण गेली नाही, उलट साऱ्यांचे तसेच घरातील मंडळींचे सहकार्य मिळाले, असे त्या अभिमानाने सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2018 2:37 am

Web Title: womens day 2018 organic farm promoter prachi mahurkar
Next Stories
1 मद्य तस्करी रोखणाऱ्या स्वाती काकडे
2 गडचिरोलीत सीआरपीएफच्या जवानाने दोन सहकाऱ्यांवर झाडली गोळी
3 मुस्लीम मुलाची जडणघडण हिंदू संस्कृतीत
Just Now!
X