महिलांनी कुठल्या क्षेत्रात काम करावे आणि कुठल्या नाही, यावर पूर्वीच्या काळी अनेक बंधने होती. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढायला लागला आहे. वाहतुकीच्या क्षेत्रात महिला मोठय़ा प्रमाणात येऊ लागल्या आहेत. उपराजधानीत वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक कॅब (बॅटरीवर चालणारी टॅक्सी) ‘ओला’ चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरातील विविध भागात त्या दिसू लागल्या आहेत. ही ओला टॅक्सी चालवणाऱ्या निर्मला ग्रेगी फोर्ड या शहरातील  एकमेव महिला आहेत.

एकीकडे प्रदूषणाची समस्या वाढत असताना देशात प्रथमच नागपुरात या प्रदूषणमुक्त गाडय़ा सुरू करण्यात आल्या. ओला कंपनीच्या  पहिल्या महिला चालक असा मान मिळवणाऱ्या निर्मला ग्रेगी फोर्ड गेल्या आठ महिन्यांपासून हे काम करत आहेत. वयाची साठी गाठलेल्या निर्मला फोर्ड युवकांना लाजवेल अशा पद्धतीने नागपूरकरांना ओलाच्या माध्यमातून सेवा देत आहेत. गाडी शिकण्याची लहानपणापासून इच्छा होती. मात्र, या गाडीचा उपयोग रोजगार म्हणून करावा लागेल असे कधीही वाटले नाही. रामनगरमध्ये किरण खरवडे यांच्याकडे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर टॅक्सी विकत घेऊन ती चालवणे सुरू केले. सुरुवातीच्या कोराडी ते बर्डी या मार्गावर शिकवणी वर्गाला किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना घेऊन जायची. मात्र, उन्हाळ्यात शाळा बंद झाल्यानंतर आर्थिक मिळकत बंद होत असे. असेच एक दिवस बॅटरीवर चालणारी ओला गाडी शहरात सुरू होणार असल्याची कंपनीची जाहिरात वाचण्यात आली आणि कंपनीकडे अर्ज केला. अर्ज केल्यावर कंपनीकडून बोलावणे आले. प्रत्यक्ष मुलाखतीत त्यांनी गाडी चालवण्याची माझी कुठलीही परीक्षा न घेता कामावर रूजू करून घेतले. ज्या दिवशी नागपुरात ओला गाडीचे लोकार्पण झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मला गाडी देण्यात आली आणि तेव्हापासून प्रवाशांना सेवा देत आहे. या व्यवसायात मी आनंदी आहे, असे त्या उत्साहाने सांगतात.

ओला कंपनीत एकमेव महिला असली तरी कुठलाही भेदभाव केला जात नसून  कंपनी आणि सहकाऱ्याकडून सतत प्रोत्साहन मिळते.  या क्षेत्रात आल्यावर भीती वाटत नाही का, असे अनेकजण विचारतात मात्र भीती मनात धरली असती तर या क्षेत्रात आलेच नसते. क्षेत्र कुठलेही असो, काम करण्याची आवड आणि जिद्द पाहिजे. आईवडिलांनी केलेले संस्कार आणि पती ग्रेगी व मुलांनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ही नोकरी करू शकले. गाडी चालवताना अनेकदा चांगले व वाईट अनुभव आले. मात्र, त्याचे कधी भांडवल केले नाही. गाडी घेऊन फिरताना अनेक लोक थांबून माझे कौतुक करतात असे त्या म्हणाल्या.

हा व्यवसाय करून संसार सांभाळावा लागतो.  तीन मुले आहेत आणि त्या सर्वाचे विवाह झाले असून त्यातील दोघे ऑस्ट्रेलिया, मुंबईत स्थायिक झाले, तर तिसरा  आमच्यासोबत असतो. ताजबाग ते प्राईड  हॉटेल दरम्यान एक तरुण माझ्या टॅक्सीत बसला. मुलांच्या वयाचा असल्यामुळे तो या प्रवासात माझ्याशी बोलत होता.

त्यातून त्याने मावशीचे नाते माझ्याशी जोडले. अशी अनेक नाती जोडणारी माणसे या व्यवसायात मिळाली आहेत, असे त्या म्हणाल्या. आज शहरात ओला चालवणारी

मी एकमेव महिला असली तरी अन्य महिलांनी मनात कुठलीही भीती न ठेवता या व्यवसायात यावे, असे निर्मला यांचे आग्रहाचे सांगणे आहे.