मंगला गवळी
कुटुंबात मी सर्वात धाकटी. मोठा भाऊ आणि बहीण यांचे लग्न झालेलं. ते दोघेही आपापल्या संसारात आनंदात आहेत. बाबा रेल्वेत होते. त्यांचे १९७६ मध्ये निधन झाले. कर्त्यां माणसाचं छत्र हरपलं की डोक्यावरचं छत्रही सोडावे लागते इतक्या सरळसाध्या ‘सरकारी’ नियमाच्या परंपरेला धरून रेल्वेने आम्हाला क्वॉर्टर सोडायला सांगितलं. त्यानंतर रामेश्वरीत भाडय़ाने खोली घेऊन राहू लागलो. मी आठव्याच वर्गात होते. बाबांच्या अवघ्या अडीचशे रुपयांच्या पेन्शनच्या भरवशावर घरचा गाडा हाकणं सोपं नव्हतं. पण परिस्थितीला शरणं न जाता पडेल ते कामं करत करत शिक्षण सुरु ठेवलं. माझे शालेय शिक्षण सुळे विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण कमला नेहरू महाविद्यालयात झाले. पहिल्यापासून अभ्यासात गती होती. त्यासाठी वडिलांकडून माझे कायम कौतुक होत असे. महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धेत सक्रिय सहभाग असायचा. वार्षिक अंकात लिखाण केलं. दहावी, बारावी झाले. पुढे शिक्षण सुरु ठेवायचे तर स्वत: कमावण्याला पर्याय नाही हे वास्तव एव्हाना मी स्वीकारलं होतं. मग सुरु केले शिकवणी वर्ग. पहिली ते नववीपर्यंत मुलांच्या शिकवण्या सुरू केल्या. फावल्या वेळेत दारोदार पायपीट करून मसाल्याची पॅकेटस विकले. तेव्हाचे केलेले श्रम फळाला आले आणि मी कला शाखेची पदवीधर झाले. शिकण्याची असोशी कायमच होती, मराठी वाडमय याविषयाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबरच मराठीची प्राध्यापिका होण्याचं ध्येय होतं. परंतु वडिलांचे अकाली निधन आणि त्यापाठोपाठ आईचा गंभीर आजार. यामुळे ते साध्य होऊ शकले नाही. परंतु त्याबद्दल अजिबात खंत नाही. पहिलं वर्ष पूर्ण होत ना होतं तोच आईची प्रकृती प्रचंड खालावली. तिला उठता-बसता येईना. कसेबसे उठल्यास चालताना तोल जायचा. चाचण्या केल्यानंतर कळले की तिच्या शरीरात रक्ताची कमरता आहे. तिच्या पाठीचा कणा वाकत आहे. डॉक्टरांनी तिला नियमित औषधे, जेवणाच्या वेळा ठरवून दिल्या. त्याचे पालन करायचे तर सतत कोणीतरी तिच्या जवळ असणं आवश्यक होतं. घरात दुसरी कमावती व्यक्ती नाही आणि बाबांचे मिळणारं अत्यल्प सेवानिवृत्ती वेतन, घरचा जमाखर्च कधी जुळतच नव्हता. खरतरं शिक्षण लवकरात लवकर पूर्ण करून नोकरी करणे सक्तीचे झाले होते. पण त्याघडीला तोळामासा प्रकृतीची आई हवी की पुढे जावूनही करता येईल अशी नोकरी हवी याचा निर्णय मलाच घ्यायचा होता. त्याघडीला आईच्या सेवासुश्रृतेचे पारडे जड झाले. घेतलेल्या निर्णयाचे परिणामही मलाच भोगायचे होते, मी एम.ए. द्वितीय वर्षांला प्रवेश घेतला नाही.
आईच्या आरोग्याची काळजी घेताघेता घरात चारपैसे यावे म्हणून रुग्णालयात स्वागत प्रतिनिधीची नोकरी केली. रात्री दहा वाजेपर्यंत हे काम चालायचे. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आईच्या जेवण व औषधाच्या वेळा चुकायला लागल्या आणि दिवसेंदिवस तिची प्रकृती आणखीनच ढासाळायला लागली. अखेर मी त्या नोकरीला राम राम ठोकला. त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून आलेली संधी स्वीकारली नाही. आईला दर महिन्याला किमान दोन हजार रुपयांची औषधं लागतात आणि दर सहा महिन्यांनी रक्त द्यावे लागते. आईचं आजारपण, नोकरीच्या धर-सोडीत वीस वर्षांचा आयुष्यातील उमेदीचा काळ कसा सरला ते कळलचं नाही. आईचे वय आज ७२ वर्षे आहे.

आईची सुश्रृषा हेच आयुष्याचे ध्येय.
उच्च शिक्षित होऊन करिअर करण्याची संधी असताना मी स्वत घरी राहून आईची सुश्रृषा करण्याचा पर्याय माझ्या आवडीने निवडला आहे. आईच्या अवती-भवती फिरताना मला माझं निरागसं बालपण आठवतं. दिवस कसा जातो कळतचं नाही. महाविद्यालयात शिकतांना इतर मुलींप्रमाणेच माझ्याही नशिबात ‘ झोपाळ्यावाचून झुलायचे’ दिवस कधी येतील याची मला प्रतीक्षा होती. परंतु आईचं आजारपण, स्वत:हून स्वीकारलेली तिची जबाबादारी दुसऱ्या कोणावर सोपवण्याची कधी इच्छाच झाली नाही. माझ्याइतके तिचे कोण मायेने करेल या काळजीपोटी मध्येच शिक्षण सोडले नोकरी वा व्यवसायाचा विचारही मनात आणला नाही. लग्न हा तर आता दूरचाच विषय आहे. आईची सुश्रृषा एवढेच आता आयुष्याचे ध्येय आहे. आता पन्नाशीच्या पुढे गेले आहे. माझ्या आईला देव भरभरून आयुष्य देवो आणि तिची सेवा करण्याचे मला बळ देवो हेच आता देवाकडं मागणं आहे.