साक्षरतेत पुढारलेले नागपूर सार्वजनिक आरोग्यात मागासच स्मार्ट सिटीत महिलांच्या कुचंबनेकडे अक्षम्य दुर्लक्ष

साक्षरतेमध्ये आघाडीवर असलेले नागपूर शहर महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र फारच मागासलेले आहे. शहरातील महिलांची लोकसंख्या १४ लाख असताना स्वच्छतागृहांची संख्या ५६ हजार हवी. मात्र, ती जेमतेम ४७२ आहेत.

महाराष्ट्राची हिवाळी राजधानी किंवा संत्रानगरी अशी ओळख असलेले नागपूर हे भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गणले जाते. २०११च्या जनगणनेनुसार नागपूरची लोकसंख्या २४,०५,६६५ आहे. त्यात पुरुष १२,२५,४०५ तर महिलांची संख्या ११,८०,२६० आहे. दरवर्षी ०.०६२ने लोकसंख्या वाढत जाते. त्यानुसार २०१८मध्ये अंदाजित लोकसंख्या २८.७२ लाख एवढी असेल. त्यात पुरुष व महिलांच्या लोकसंख्येचे गुणोत्तर १०००:९६३ एवढे आहे. २०१८तील महिलांची लोकसंख्या १४ लक्ष इतकी गृहीत धरली तरी शहरात ५६ हजार सार्वजनिक स्वच्छतागृहे हवीत. मात्र, ती जेमतेम ४७२ आहेत.

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षणाबरोबरच आरोग्य ही मूलभूत गरजांमध्ये गणले जाते. मात्र, महिलांसाठी स्वच्छतागृहासारखी मूलभूत गरज नागपुरात पूर्ण होत नसल्याचे विदारक चित्र आहे. गेल्यावर्षी महापालिकेने भरारी पथकांद्वारे सार्वजनिक जागेवर लघुशंका करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली, पैसे वसूल केले. मात्र, पुरेसे सार्वजनिक स्वच्छतागृहे शहरात नाहीत, याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक ३० पुरुषांमागे १ एक व २५ महिलांमागे एक स्वच्छतागृहाची गरज असल्याचे महापालिकाच सांगत असते. पण, त्यावर कृती मात्र शून्य आहे. नागपुरात बस स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणीही स्वच्छतागृहे आहेत मात्र, अस्वच्छतेपायी तेथे कोणी जात नाहीत.

महापालिकेची स्वच्छतागृहे घाणेरडी

शहरातल्या शहरात प्रवास करणाऱ्या किंवा ग्रामीण भागातून शहरात ये-जा करणाऱ्या महिलांना लघुशंका, शौच, सॅनिटरी नॅपकीन बदलण्यासाठी, कधी आंघोळीसाठीही किंवा तयारीसाठी स्वच्छतागृहांची गरज भासते. महापालिकांच्या स्वच्छतागृहांमध्ये अजिबातच सोय नसते. त्याठिकाणी कायम अस्वच्छता दृष्टीस पडते.

 रोटरी क्लब, कॅलिडर्सची प्रसाधनगृहे चांगली, पण..

रोटरी क्लब आणि कॅलिडर्स या खासगी संस्थेची शहरात १५ स्वच्छतागृहे आहेत. ती फार स्वच्छ असतात. त्यातील १० पुरुष व स्त्रियांसाठी तर पाच फक्त महिलांसाठी आहेत. ही प्रसाधनगृहे सध्या महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. ही स्वच्छतागृहे नि:शुल्क असली तरी तेथील काम करणारे महिलांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी ‘लोकसत्ता’ला प्राप्त झाल्या आहेत.

शौचालय शोधून सापडत नाही

बैद्यनाथ चौकातून मोरभवनमधील स्वच्छतागृहात यावे लागले. मी पतसंस्थेत वसुली अधिकारी असल्याने शहर ते ग्रामीण भाग अशी ये-जा करावी लागते. त्यामुळे पेट्रोलपंप, सरकारी दवाखाना, बसस्थानक किंवा मोरभवन अशी ठिकाणे लघुशंकेसाठी सतत शोधत राहवी लागतात. बसस्थानकांवर फार अस्वच्छता असते पण, नाईलाज आहे.

– सीमा आसोलकर

महिलांना फारच त्रास सहन करावा लागतो

सार्वजनिक ठिकाणी लघुशंकेसाठी महिलांना फारच त्रास सहन करावा लागतो. कुठेही जाता येत नाही. पुरुषांपेक्षा महिलांना स्वच्छतागृहांची गरज जास्त आहे. पण, नेमकी त्यांच्यासाठीच ती उपलब्ध नाहीत. मी बँकेत काम करते. आज घाईत निघाले त्यामुळे शोधत शोधत सार्वजनिक स्वच्छतागृहात आले.

– भाग्यश्री कपिले

मोरभवनात पैसे मागतात

आम्ही कामठीहून शंकरनगर चौकात घरकामासाठी येतो. मोरभवनवरून ये-जा करावी लागते. दोघी बरोबरच असतो.  एक स्वच्छतागृह महाराजबागेच्या फाटकासमोर असायला हवे. रोटरी क्लबचे एक स्वच्छतागृह मोरभवनमध्ये सुरू झाले आहे. पण, तेथे पैसे घेतात. एखादवेळी सुटे नसतील तर बसमध्ये बसल्यावरही हाक मारून पैसे वसूल केले जातात.

–  प्रभा लोखंडे आणि कीर्ती पौनीकर

केंद्रीय शहर विकास मंत्रालयामार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुरुष व स्त्रियांमागे किती स्वच्छतागृहे असावीत, याचे काही मानक आहेत. त्यात ३० पुरुषांमागे एक शिट आणि २५ महिलांमागे शिट असे गुणोत्तर आहे. त्यापूर्वी आम्ही सव्‍‌र्हे केला. ज्यांच्याकडे नाही त्यांना आम्ही सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधूनही दिले.

– डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी, महापालिका