कै. राम गणेश गडकरी नाटय़नगरी, नागपूर

मराठीत नाटक करणाऱ्याला नाटय़कर्मी किंवा रंगकर्मी म्हटले जाते. डॉ. श्रीराम लागू किंवा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी त्यांना ‘रंगधर्मी’ हा नवा शब्द दिला. परंतु हल्ली ‘धर्म’ या शब्दाने दचकायला होते. हल्ली धर्माची जी व्याख्या करण्यात येत आहे ती वेगळीच आहे. ज्यांना ती मान्य नाही त्यांना धर्मविरोधी ठरवले जात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी शुक्रवारी येथे काढले.

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘खरं तर धर्म हा व्यापक पैस असलेला शब्द आहे. मीही धर्माचा थोडाफार अभ्यास केला आहे. मी ‘षड्दर्शने’ शिकलो आहे. माझा हा जो काही अल्प अभ्यास आहे, त्यात मला वेगळ्याच गोष्टी सापडतात. आज धर्मासंबंधात जे काही सांगितले जाते. ते मला तिथे कुठेच सापडले नाही. ’’

दुसऱ्याला दु:ख न देणे हा धर्माचा खरा अर्थ आहे. पण, कुणालाच हा धर्म कळलेला नाही. सगळ्या जगातून माझ्याकडे उदात्त विचार येवोत, असे सांगणारा हिंदू धर्म आहे. एवढे औदार्य असलेल्या धर्माबद्दल आज मी जे ऐकतो त्याने माझ्या मनात विषाद दाटून आला आहे, असे हताश उद्गार त्यांनी काढले.  वेद आणि उपनिषदांमध्ये आजच्या अनेक आधुनिक शोधांचे मूळ सापडते, असे हल्ली सांगितले जाते. परंतु मला तरी यातले काहीच सापडले नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. मी अभ्यासलेला सहिष्णू धर्म आज कुठे गेला, असा प्रश्न मला पडतो. आज आम्ही सांगू तो धर्म आणि तो मानला नाही तर त्यांना धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही ठरवले जाते, असे सांगून एलकुंचवार पुढे म्हणाले की, आपल्याकडे राज्यकर्ते कधीच सहिष्णू नव्हते. व्यवस्थेविरोधात बोलणाऱ्या सफदर हाश्मींचा मुडदा पाडण्यात आला, सॅटेनिक व्हर्सेस या कादंबरीवर बंदी घातली गेली. खरं तर ती एक सामान्य कादंबरी होती. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर यांच्यावर बंदी आणण्यात आली. यावरूनच आपण कधीही सहिष्णू नव्हतो, हे सिद्ध होते.

नाटय़कलेची सगळ्यांनाच भीती वाटते. नाटय़धर्मी हा शब्द वापरायलाही भीती वाटते. खरं तर या सगळ्याच नाटकाशी संलग्न गोष्टी आहेत, त्या विलग करता येत नाहीत. साहिष्णूतेत मतभिन्नतेला वाव असतो. शंकराचार्य आणि मंडणमिश्र यांच्यातल्या वादात मंडणमिश्रांच्या विदुषी असलेल्या पत्नीने न्यायाधीशाची भूमिका बजावली, इतके आपण सहिष्णू होतो. हे सगळं कुठे गेलं, असा प्रश्न मला पडतो आणि त्रास होतो. त्यामुळे नाटय़धर्मीनी एखादी गोष्ट पटली नाही किंवा त्या संदर्भात मतभेद असतील तर तसे स्पष्टपणे मांडले पाहिजे. तोच नाटय़धर्मीचा खरा धर्म आहे. नाटय़धर्मीवर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात. अशा कुठल्याही संकटांचा सामना करण्याची जिद्द ज्याच्यात असेल त्यालाच मी नाटय़धर्मी मानतो. बादल सरकार अशांपैकी एक होते. हरीश इथापे, अतुल पेठे यांच्यासारखी निष्ठेने नाटक करणारी मंडळी ही नाटय़धर्मी असतात, तर नाटकाकडून लौकिक गोष्टींची अपेक्षा करणारे नाटय़कर्मी असतात, असेही ते म्हणाले.

नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, संमेलनाचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांचीही यावेळी भाषणे झाली.   उद्घाटन सोहळ्यापूर्वी पुलवामा  दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

.. तर नाटकांना चांगले दिवस येतील – गडकरी

सरकारचा वरदहस्त, जनतेचे समर्थन आणि रंगकर्मीने सादर केलेले उत्तम नाटक यांचा मेळ जुळून आला तर नाटकांना आजच्यापेक्षा चांगले दिवस आल्यावाचून राहणार नाहीत, असे उद्गार ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन गडकरी यांनी काढले.

नाटय़ संमेलनाचा उद्घाटन सोहळा निम्म्यात येईपर्यंत स्वागताध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलन सोहळ्यास आलेच नव्हते. मुख्यमंत्र्यांनी तर संमेलनाकडे पाठच फिरवली आणि स्वागताध्यक्ष साडेआठच्या सुमारास संमेलनस्थळी पोहोचले. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आपणास इथे येण्यास उशीर झाला, असा खुलासा त्यांनी केला.

मराठी रंगभूमीच्या वैभवशाली इतिहासाचा परामर्श घेऊन गडकरी म्हणाले की, मी जेव्हा इतर राज्यांत जातो तेव्हा मराठी नाटक किती श्रेष्ठ आहे, याची प्रचिती येते. नाटय़गृहाचे भाडे आणि वृत्तपत्रीय जाहिरातींचा खर्च कमी झाला तर मराठी नाटकांना चांगले दिवस येतील, असे मला वाटते. आम्ही नागपुरात कविवर्य सुरेश भट नाटय़गृह बांधून त्या दृष्टीने प्रयत्न केले.

’मावळत्या नाटय़ संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी नवे संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांना संमेलनाची सूत्रे प्रदान करताना शिंदेशाही पगडी घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याला नकार दिला. मात्र फुले पगडी त्यांनी स्वीकारली. पगडी संदर्भात गज्वी यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. हा सोपस्कार संपताच त्यांनी फुले पगडीही काढून ठेवली.

’राष्ट्रीय सन्मानप्राप्त रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे, अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदी स्मरणिका आणि समग्र गज्वी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

’संमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते सोहळा अर्धवट सोडून निघून गेले. त्यांना विवेक रानडे यांनी त्वरित सेव्हनस्टार रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले.