शफी पठाण

*  विदर्भ साहित्य संघाच्या निर्णयाबाबत आश्चर्य

* समाजमाध्यमावरील मुखपृष्ठ बघून साहित्य वर्तुळात चर्चा

भाषा, साहित्य, संस्कृतीचे वैदर्भीय पालकत्व लाभलेल्या विदर्भ साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. यामध्ये ‘अर्वाचीन मराठी आध्यात्मिक कविता’ या काव्यसमीक्षापर ग्रंथाला समीक्षेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परंतु या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे जे छायाचित्र समाजमाध्यमावर फिरत आहे व स्वत: या पुस्तकाच्या लेखिकेनेही समाजमाध्यमावर या पुरस्काराची आनंदवार्ता देताना जे मुखपृष्ठ वापरले आहे, त्याच्या शीर्षकातच दोन ठिकाणी मोठा शब्दघोळ आहे. मुखपृष्ठावर ठळकपणे नजरेत भरणाऱ्या व्याकरणाच्या चुका दिसत असल्याने या पुस्तकातील समीक्षेच्या दर्जाबाबत साहित्य वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.  विदर्भ साहित्य संघाने व त्यांच्या निवड मंडळाने हेच सदोष मुखपृष्ठ असलेले पुस्तक पुरस्कारासाठी निवडले का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

विदर्भ साहित्य संघातर्फे दरवर्षी १४ जानेवारीला संघाच्या वर्धापनदिनी भाषा, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मंडळींना विविध श्रेणीतील पुरस्कार देऊन गौरवले जाते. या परंपरेप्रमाणे यंदाही या पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. अमृता इंदूरकर यांच्या ‘अर्वाचीन मराठी आध्यात्मिक कविता’ या काव्यसमीक्षापर ग्रंथाला कविवर्य आ. रा. देशपांडे अर्थात कवी ‘अनिल’ आणि कुसुमावती देशपांडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा समीक्षा क्षेत्रातील ‘कुसुमानील स्मृती समीक्षा लेखन’ पुरस्कार जाहीर  झाला आहे. परंतु या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील अगदी ठळक अक्षरातील ‘अर्वाचीन मराठी आध्यात्मिक कविता’ या शीर्षकातच दोन मोठय़ा चुका दिसत आहेत. आध्यात्मिक या शब्दाला ‘अध्यात्मिक’ असे लिहिले आहे आणि यापेक्षाही धक्कादायक म्हणजे कविता हा जगप्रचलित शब्द चक्क ‘कवीता’ असा दीर्घ लिहिण्यात आला आहे.  हेच मुखपृष्ठ असलेले पुस्तक पुरस्कारासाठी प्रस्तावित केले गेले असेल तर वि. सा. संघ वा निवड मंडळाच्या एकाही सदस्याला मुखपृष्ठावरील ठळक अक्षरातील या चुका कशा दिसल्या नाहीत, असे अनेक प्रश्न साहित्य वर्तुळात चर्चिले जात आहेत.

भाषा एकसूत्रीकरणातील योगदान विस्मरणात!

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात साहित्य-संस्कृती मंडळाची योजना करताना प्रमाण मराठी भाषेमध्ये एकसूत्रीकरण असावे, यासाठी राज्यभरातील साहित्य मंडळांकडून सूचना मागवल्या. त्यात शुद्धलेखनाच्या नियमांबाबतचा सल्लाही अपेक्षित होता. त्यावेळी विदर्भ साहित्य संघाने शुद्ध भाषेच्या एकसूत्री-करणासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्याच वि.सा. संघात समीक्षेसारखा महत्त्वाचा पुरस्कार कविता हा शब्द दीर्घ लिहिणाऱ्या पुस्तकाला दिला जातो हे मोठेच आश्चर्य आहे.

पुस्तकाची पहिली प्रत चुकून दिली गेल्याने त्यात ‘कवीता’ व  ‘अध्यात्मिक’ या दोन शब्दात व्याकरणाच्या चुका दिसत आहेत. तसेही आज मराठी भाषेत अनेक नवीन वैकल्पिक शब्द आले आहेत. संस्कृतच्या नियमानुसार मधला शब्द ऱ्हस्व लिहावाच का, याबाबतही वाद-प्रतिवाद आहेत.

– डॉ. अमृता इंदूरकर, लेखिका, ‘अर्वाचीन मराठी आध्यात्मिक कविता’

पुरस्कारांसाठी निवड मंडळामार्फत लेखक व पुस्तकांची निवड केली जाते. निवड मंडळाच्यादृष्टीने पुस्तकातील मजकुराची वस्तुनिष्ठता व दर्जा महत्त्वाचा असेल. त्यामुळे कदाचित व्याकरणाकडे दुर्लक्ष झाले असेल.

– विलास मानेकर, सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ