राजेश्वर ठाकरे

नागपूर (इतवारी) ते नागभीड ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केले जाणार आहे. या मार्गावर रुळ टाकण्याची गती अतिशय वेगवान असेल. त्यामुळे ११६ किलोमीटर रेल्वेमार्ग २१ महिन्यांत पूर्ण होईल.

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (एमआरआयडीसी) हा महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीड ते  नागपूर (इतवारी) ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम एमआरआयडीसी करीत आहे. तसेच उमरेड येथील डब्ल्यूसीएलमधून कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेमार्ग (कॉर्ड लाईन) टाकण्याची योजना आहे.

नागभीड हे विदर्भातील ब्रिटिशकालीन नॅरोगेज रेल्वेचे एक मोठे जंक्शन होते. परंतु ते महाराष्ट्राच्या उपराजधानीशी ब्रॉडगेजने जोडण्यासाठी २०२२ साल उजाडावे लागेल. आता या प्रकल्पाला रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारने हिरावा कंदील दाखवला आहे. १,४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दोघांचाही अर्धा-अर्धा वाटा राहणार असून दोन्ही सरकारांनी निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबरोबर (एमआरआयडीसी) देखील जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रुळ टाकण्याचे, रेल्वे पूल बांधण्याचे आणि स्थानक उभारण्याचे काम करणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ २१ महिन्यांत पूर्ण होणार असल्याचा दावा एमआरआयडीसीने केला आहे. रुळ टाकण्यासाठी ‘एनटीसी मशीन’चा वापर केला जाणार आहे. १९ रेल्वेस्थानके अत्याधुनिक बनविण्यात येतील. यात प्रामुख्याने कोटगाव, मांगली, टेम्पा, भुयार, पवनी, भिवापूर, कोरेगाव, उमरेड, कुही, तितुर, भांडेवाडी यांचा समावेश आहे.

वर्धा, गोंदिया मार्गावरील ताण कमी होणार

रेल्वे बोर्डाची तत्त्वत्वत: मान्यता आधीच प्राप्त होती. महाराष्ट्र सरकारने आपल्या हिस्साचा प्रकल्प निधी देण्यास २५ जून २०२० ला मंजुरी दिली. त्यामुळे एमआरआयडीसीने या प्रकल्प अधिक वेगाने करण्याचा आणि केवळ २१ महिन्यात ब्रॉडगेजचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या रेल्वेमार्गामुळे नागपूर ते वर्धा आणि नागपूर ते गोंदिया या रेल्वेमार्गावरील ताण कमी होईल.

नागपूर ते नागभीड अंतर ४० मिनिटे

या रेल्वेमार्गावर प्रवासी गाडय़ा १६० किलोमीटर प्रतितास आणि मालगाडी १०० किलोमीटर प्रतितास धावेल. म्हणजेच ४० ते ४५ मिनिटांत नागपूरहून नागभीडला पोहचता येणार आहे.

कोळसा वाहतूक सुलभ होईल

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेतील ६२८ किलोमीटर नॅरोगेज नेटवर्कमधील केवळ इतवारी ते नागभीड या ११६ किलोमीटर रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतराचे काम अडकले होते. आता महामंडळाने ब्रॉडगेजसोबत कॉर्ड लाईन टाकण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कोळसा वाहतूक सुलभ होईल. या रेल्वेमार्गाचा मुख्य उद्देश कोळसा वाहतूक अधिक गतीने करणे हा आहे.

ब्रॉडगेजचे काम सुरू करण्यासाठी डिसेंबर २०१९ पासून इतवारी ते नागभीड रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या मान्यता प्राप्त झाल्या असून आराखडा तयार आहे. उमरेड कोळसा खाणीशी  रेल्वे जोडण्याची योजना असून त्यामुळे उत्तर-दक्षिण भारतात जाणाऱ्या मालगाडय़ांना नवा मार्ग मिळेल.

– राजेश कुमार जयस्वाल, व्यवस्थापकीय संचालक, महारेल.