लपवा-छपवीकरिता सेवा पुस्तिकेमध्येही खाडाखोड, ‘महावितरण’मध्ये असलेला सख्खा भाऊ दुसऱ्या जातीचा
महापारेषणचे अनिल गणपत पाटील हे कार्यकारी अभियंता, अति उच्चदाब बांधकाम विभाग, काटोल रोड, नागपूर यांनी दुसऱ्या संवर्गातील जातीवर अतिक्रमण करून नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार एका कामगार संघटनेकडून मुख्यालयाच्या निदर्शनात आणून दिला आहे. त्यांचा सख्खा भाऊ महावितरणमध्ये सेवेत असून त्यांनी दुसऱ्या जातीच्या संवर्गातून नोकरी मिळवली आहे. तेव्हा दोघांपैकी खरी जात कुणाची? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच या विषयावर ‘महापारेषण’कडून मात्र कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मागासलेल्या वेगवेगळ्या जाती-जमातीतील लोकांना न्याय मिळावा म्हणून वेगवेगळ्या संवर्गात वेगवेगळ्या प्रमाणात आरक्षण निश्चित केले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून कोणत्या संवर्गात कोणत्या जातीचा समावेश आहे, याचीही सूची निश्चित आहे, परंतु त्यानंतरही शासनाच्या अनेक विभागात वेगळ्याच जातीच्या लोकांकडून वेगळ्याच जातीच्या संवर्गातील नोकरीवर खोटी जात दाखवून अतिक्रमण केले आहे. महापारेषणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या पदावर नोकरी मिळवण्याबाबतही हाच प्रकार घडल्याचा प्रकार एका कामगार संघटनेकडून पुढे आणण्यात आला आहे. त्याकरिता अविनाश झिबल रंगारी या व्यक्तीकडून बरीच माहिती गोळा करण्यात आली.
माहितीच्या अधिकारात पुढे आले की, कार्यकारी अभियंता अनिल गणपत पाटील यांनी अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून अकरावीचे शिक्षण घेतले होते. याप्रसंगी त्यांनी ओबीसी संवर्गातून कलार जात दाखवत महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, परंतु शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथे प्रवेश घेतल्यावर त्यांनी जात बदलून कहार अशी दाखवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी महापारेषणमध्ये सेवा मिळवली. ही सेवा त्यांनी एनटी-बी या संवर्गातून मिळवली. या जातीच्या आधारावर त्यांनी बरेच शासकीय पदोन्नतीचे लाभही घेतले, परंतु हा प्रकार महापारेषणच्या कामगार संघटनेच्या निदर्शनात आल्यावर त्यांनी मुख्यालयात यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांच्या सेवापुस्तिकेत खोडाखाडी असल्याचेही नमूद केले आहे. तक्रारीला बरेच दिवस लोटल्यावरही महापारेषण मुख्यालयाकडून अद्याप त्यावर कारवाई होत नसल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा वेगवेगळ्या कामगार संघटनांमध्ये आहे. विशेष म्हणजे, अविनाश झिबल रंगारी यांना माहितीच्या अधिकारात अनिल पाटील यांचा सख्खा भाऊ प्रदीप गणपत पाटील हा कनिष्ठ यंत्रचालक म्हणून महावितरणमध्ये सेवेवर असल्याचे कळते. या भावाने ओबीसी संवर्गातून कलार जात दाखवून ही नोकरी मिळवल्याचे त्याच्या निदर्शनात आले. तेव्हा दोघा भावांपैकी खरी जात कुणाची? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तक्रारीत तथ्य नाही
कुणा कामगार संघटनेकडून माझ्या जातीशी संबंधित तक्रार केली असल्यास मला माहिती नाही, परंतु असली तक्रार असल्यास त्यात काहीच तथ्य नाही. मी एनटी-बी संवर्गाचा आहे. याप्रकरणी चौकशी झाल्यास मी निश्चितच निर्दोष सिद्ध होईल.
– अनिल पाटील, कार्यकारी अभियंता,
महापारेषण, नागपूर विभाग

अद्याप तक्रार नाही
कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या संदर्भात माझ्यापर्यंत अद्याप एकही तक्रार आली नाही, परंतु आल्यास ती मुख्यालयाला पाठवण्याचा नियम असून त्यानुसार प्रक्रिया केली जाईल. पुढील कारवाईचा अधिकार मुख्यालयाला आहे, परंतु या विषयावर वर्तमानपत्रांशी माझे बोलणे योग्य नसून ही आमची अंतर्गत बाब आहे.
– मिलिंद बहादुरे, मुख्य अभियंता, महापारेषण, नागपूर विभाग