19 March 2019

News Flash

रक्ताच्या बदल्यात रक्तदान न करण्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांचा कल

अनेकदा रक्त घेतल्यावर रुग्णांचे नातेवाईक रक्तदान करीत नाही, असे आढळून आले आहे.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांची स्थिती; आज जागतिक रक्तदाता दिन

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तपेढीतून रक्त घेतले जाते. मात्र, त्याचा परतावा रक्तदानातून केला जावा असा संकेत आहे, परंतु अनेकदा रक्त घेतल्यावर रुग्णांचे नातेवाईक रक्तदान करीत नाही, असे आढळून आले आहे.

१४ जून या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त याबाबत माहिती घेतली असता नागपूर विभागातील तीन जिल्ह्य़ांमध्ये वरील स्थिती आढळून आली. अपघात किंवा आजारामुळे अत्यवस्थ रुग्णांसाठी तातडीने रक्ताची गरज भासते. खासगी किंवा शासकीय रक्तपेढीतून रक्त घेतले जाते. नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या गेल्या पाच महिन्याच्या अहवालानुसार पूर्व विदर्भातील वर्धा, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्य़ांत अत्यवस्थ रुग्णांना उपलब्ध केलेल्या रक्ताच्या बदल्यात एकाही नातेवाईकांनी परतावा म्हणून रक्तदान केले नाही. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्य़ात नातेवाईकांनी परतावा म्हणून रक्तदान केले असले तरी ही संख्या कमी आहे. वरील काळात वर्धा जिल्ह्य़ात २१०, भंडारा जिल्ह्य़ांत ५६०, गडचिरोली जिल्ह्य़ात ३१८ जणांनी विविध रक्तदान शिबीर किंवा रक्तपेढींमध्ये रक्तदान केले. चंद्रपूरला ५३२, गोंदिया ६३५, मेयो ३२७, मेडिकलला ८०३ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे पूर्व विदर्भातील अनेक शासकीय व  खासगी रुग्णालयांना हजारो रुग्णांचे जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, अत्यवस्थ रुग्णांसाठी रक्ताच्या बदल्यात या काळात पूर्व विदर्भात एकाही महिला नातेवाईकांनी परतावा म्हणून रक्तदान केले नाही, असे आरोग्य विभागाच्या अहवालातून दिसून येते.

महिलांची संख्या अत्यल्प

उपराजधानीतील खासगी रक्तपेढय़ा, सुपरस्पेशालिटी, डागासह अहेरीतील शासकीय रक्तपेढी वगळता पूर्व विदर्भात एकूण तीन हजार ३८५ दात्यांनी रक्तदान केले. त्यात तीन हजार ३१९ पुरुष, तर ६६ महिलांचा समावेश आहे.

मेडिकलचा  नवीन उच्चांक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या रक्तपेढीत वर्ष २०१२ पासून प्रत्येक वर्षी १० हजारावर रक्त पिशव्यांचे संकलन होते. वर्ष २०१७ मध्ये ही संख्या १३ हजारावर नोंदवली गेली. ही संख्या प्रत्येक वर्षी उच्चांकच ठरते. यंदाही नवीन उच्चांक होण्याची शक्यता आहे. या विभागात प्रा. डॉ. संजय पराते, समाजसेवा अधीक्षक संजय धर्माळे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

रक्तदात्यांसाठी केवळ १० रुपये

रक्तदात्याच्या चहा व नाश्त्यासाठी शासनाकडून आजही केवळ १० रुपये प्रती व्यक्ती शासकीय रक्तपेढीला अनुदान मिळते. आजची वाढती महागाई बघता यात हा उपक्रम राबवणेच शक्य नाही. त्यामुळे दानदाते शोधून रक्तपेढींना काम करावे लागते. शासनाचे हे उदासीन धोरण बघता त्यांना खरच रक्तदान वाढवण्यात रस आहे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘‘पूर्व विदर्भात आजही मागणीच्या तुलनेत फार कमी प्रमाणात रक्तदान होते. त्यातच अत्यवस्थ रुग्णांसाठी रक्त घेतल्याच्या बदल्यात परतावा म्हणून नातेवाईकांकडून रक्तदान करण्याची संख्या खूपच कमी आहे.  एकाने रक्तदान केल्यास अनेकांचे प्राण वाचणे शक्य आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा.’’

डॉ. आर.एस. फारुखी, सहाय्यक संचालक (वैद्यकीय), आरोग्य उपसंचालक कार्यालय, नागपूर.

First Published on June 14, 2018 1:31 am

Web Title: world blood donor day blood donor issue