डॉ. रवींद्र शोभणे यांनी आठवणींना उजाळा दिला

नागपूर : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे आज गुरुवारी निधन झाले. ज्येष्ठ साहित्यिक व कथालेखक डॉ. रवींद्र शोभणे यांनी बासूदांच्या आठवणींना उजाळा  दिला. ते म्हणाले, डॉ. बासू चटर्जी यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांच्यासोबत झालेली भेट, त्यांनी माझ्या कथांवर केलेला एका मालिकेतील भाग आणि त्यानिमित्ताने झालेल्या गप्पांची आठवण झाली. २००५ एप्रिलमध्ये एक दिवस दुपारी फोन आला. ‘मै बासू दा का असिस्टंट हूँ. बासू दा आप की कहानी पे एक एपिसोड बनाना चाहते है.’  मला वाटले कुणीतरी माझी फिरकी घेत आहे. मी मग आणखी चौकशी केली. कोणती कथा,  कशासाठी एपिसोड बनवताय  वगैरे. तर त्यावर त्यांचा असिस्टंट म्हणाला, दादा आप से बात करना चाहते है. क्षणभर माझा विश्वासच बसेना. बासू चटर्जी आपल्यासोबत बोलताहेत त्यामुळे थोडे दडपणही होते. ते बोलायला लागले. आवाजात जसा दमदारपणा होता तसाच लाघवीपणाही होता.

दिल्ली दूरदर्शनसाठी त्यांना  ‘एक प्रेमकहाणी’ ही मालिका तयार करायची होती. या मालिकेत भारतातील बहुतेक भाषांमधील दोन दोन प्रेमकथा त्यांना निवडायच्या होत्या. निवड प्रक्रिया सुरूच होती. त्यात त्यांनी माझ्या  ‘इस शहर में हर शख्स’  या कथेची निवड केली होती. मला उत्सुकता होती. त्यांनी ही कथा कुठून शोधली. कारण ती मूळ माझ्या  ‘वर्तमान’ या मराठी कथासंग्रहात होती. पण ती  ‘भारतीय कहानियाँ’  या ज्ञानपीठातर्फे १९९२ मध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय निवडक कथांमध्ये निवडली गेली होती. तिचा प्रकाश भातंब्रेकरांनी सुलभा कोरे यांच्याकडून हिंदीत अनुवादित करवून घेतला होता. ती कथा बासूदांनी वाचली होती. ती त्यांनी या मालिकेसाठी निवडली होती. त्यांना त्यासाठी माझी परवानगी हवी होती. मी लगेच परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी रीतसर करारपत्र पाठवले. त्या एका कथेसाठी मला सहा हजार रुपये मानधन मिळणार होते. एका मराठी लेखकाला त्या काळी एका कथेला एवढे मानधन खूप होते. मुंबईला आलात की भेटा म्हणून त्यांनी निमंत्रण दिले होते. एका लग्नाच्या निमित्ताने दोन महिन्यानंतर मुंबईला विलेपाल्र्याच्या त्यांच्या घरी गेलो. सायंकाळ झाली होती. त्यांची प्रतीक्षा करीत बसलो. अंगात साधा बंगाली कुर्ता आणि लुंगी अशा घरगुती पोषाखात बासू दा आले. ‘कैसे हो भई ’ म्हणत त्यांनी साद घातली. उंच, दणकट शरीरयष्टी, अर्धवट पांढरे झालेले कुरळे केस. वागण्या-बोलण्यातील विलक्षण मोकळेपणा पाहून मीही विलक्षण प्रभावित झालो. त्यांना नमस्कार केला. गप्पा झाल्या आणि निघताना त्यांनी माझ्या हातात सहा हजारांचा धनादेश ठेवला. आज ते गेल्याची बातमीच आली. मध्यमवर्गीय समांतर चित्रपटांचा जमाना सुरू करणारा एक प्रतिभाशाली दिग्दर्शक आमच्यातून गेला ही दु:खद वार्ता सहन करण्यापलीकडे काहीही करता येत नाही, असे शोभणे म्हणाले.