08 March 2021

News Flash

लोकजागर : माफ करा चितमपल्ली! 

विदर्भाचा निरोप घेताना सुद्धा तुमची हीच भावना होती.

देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर आधारासाठी कुणीतरी लागतेच. तोच मिळेनासा झाल्यावर तुम्ही घेतलेला विदर्भ सोडण्याचा निर्णय अनेकांना वेदना देणारा आहे. तुमचे या टप्प्यावरचे हे स्थलांतर विदर्भाला पोरके करणारे आहेच, शिवाय त्यामागचा नाईलाज एकाकी वृद्धांच्या वाटय़ाला येणाऱ्या जळजळीत वास्तवावर व सरकारच्या नाकर्तेपणावर प्रकाश टाकणारा आहे. होय, आम्ही वैदर्भीय लोकांनी जंगल राखले. त्यात आमचे आदिवासी आघाडीवर होते. मात्र ते जंगल कसे न्याहाळायचे, त्यातल्या वन्यजीवांशी कसा संवाद साधायचा हे तुम्ही बाहेरून येऊन आम्हाला शिकवले. जंगलातले एकेक झाड व त्याचा इतिहास म्हणजे पर्यावरणीय श्रीमंतीच! ती कशी उपभोगायची हे तुमच्याकडून आम्ही शिकलो. तुम्ही सोलापूरचे. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने विदर्भात आले. नोकरीतली तीस व निवृत्तीनंतरची तीस अशी एकूण साठ वर्षे तुम्ही इथे घालवली व इथले होऊन जगले. नवेगाव बांधचे जंगल हा तुमचा ‘विकपॉईंट’. खरे तर तुम्हाला तिथेच स्थायिक व्हायचे होते पण काही कारणाने ते जमले नाही. नागपुरात तुम्ही पुस्तकाच्या गराडय़ात अभ्यासाचे बस्तान बसवले. मग तुमच्या पोतडीतून जंगल व त्यातल्या प्राण्यांची समृद्धी दाखवणारा एकेक ऐवज पुस्तकरूपाने बाहेर पडू लागला आणि आम्ही सारे हरखून गेलो. अनेकदा तुम्ही लिहिलेले वाचल्यावर ‘अरे या ठिकाणी तर आपण कित्येकदा गेलो पण जंगलाकडे या दृष्टीने बघावे लागते हे लक्षातच आले नाही’ अशा प्रतिक्रिया आपसूकच बाहेर पडायच्या.

या मागास समजल्या जाणाऱ्या प्रदेशाची श्रीमंती कशात आहे तर जंगलात, हे तुम्ही हेरले. त्या श्रीमंतीचा पट लेखनातून अलवारपणे उलगडून दाखवला. हे हेरण्यात आम्ही कमी पडलो हे खरे पण तुम्ही ते केले याचा अभिमान आम्ही सदैव बाळगला. माणूस असला म्हणून काय झाले? झाडांशी सुद्धा बोलता येते. प्राण्यांशी संवाद साधता येतो. वाचा नसली म्हणून काय झाले? प्रत्येक सजीवाला भावना असतात. त्या ओळखण्याचे कसब तुम्ही सखोल अभ्यासातून आत्मसात केले. तुम्हाला लाभलेले हे संवादाचे वरदान तुम्ही साऱ्या मराठी जगतात पोहचवले. लेखक म्हणून तुम्ही स्वत:ला कधी कोंडून घेतले नाही. जंगल व त्यातील प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी तुमच्या घराचे दरवाजे कायम उघडे राहिले. अनेकदा अशा वर्दळीमुळे साधनेत खंड पडतो. लेखनाची लय जाते. तरीही तुम्ही त्रागा केल्याचे कधी दिसले नाही. विदर्भातील बहुतांश लेखकांच्या मनात एकच भावना असते. आपले पुस्तक मुंबई, पुण्याच्या प्रकाशकांनी काढावे. तुम्ही आयुष्यभर या भावनेला कधी थारा दिला नाही. पंचेवीसपेक्षा जास्त असलेली तुमची पुस्तके विदर्भातीलच साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केली व अवघ्या मराठी जगतात ती लोकप्रिय ठरली. ऐवज अस्सल असला की प्रादेशिकवादाच्या सीमा आड येत नाही. चकवा चांदण, रानवाट, रातवा, निसर्गवाचन, घरटय़ाच्या पलीकडे अशा कितीतरी पुस्तकांची पारायणे आजही घरोघरी होताना दिसतात. तुमचे पक्षी, प्राणी, वृक्ष कोशनिर्मितीचे काम तर लाजबाब. खरे तर हे एकटय़ाने पेलण्याचे शिवधनुष्य नाही. तरीही तुम्ही हट्टाने हे सारे प्रकल्प तडीला नेले. लेखनापेक्षा खरे तर हे अवघड. यासाठी प्रचंड मेहनत लागते. उतारवय व कौटुंबिक संकटाची पर्वा न करता  हे काम तुम्ही पूर्ण केले, हे सारे तुमच्यातल्या प्रबळ इच्छशक्तीची साक्ष देणारेच.

जंगल व प्राण्यांवर लिहिण्यासाठी प्रचंड मुशाफिरी करावी लागते. रानवाटा तुडवाव्या लागतात. थकलेल्या गात्रांचा विचार न करता तुम्ही हे सारे केले. त्यामुळे वाचकांना अनेक नवनव्या गोष्टी कळल्या. उंदीर चोरी करतात. माकडांना दुष्काळाची चाहूल आधी लागते. त्यांनी पेटवलेल्या शेकोटीतले लाकूड चुलीत जळत नाही. दुष्काळात तग धरता यावी म्हणून माकडे लाडू करून ठेवतात. पिसारा नसलेल्या मोराच्या कथा व व्यथा. म्हातारा हत्ती नेहमी जलसमाधी घेतो. गातो तो केवळ नर कोकीळ, कोकिळा नाही. त्यामुळे लता मंगेशकरांना गानकोकिळा म्हणणे कसे चूक आहे हा तुम्ही काढलेला निष्कर्ष! हे सारे वैदर्भीयच काय पण मराठी वाचकांसाठी नवे होते. गवताच्या कुरणांमध्ये असलेले कीटक नुसता आवाज करत नसतात. त्यातही एक लयबद्ध संगीत असते हे तुमचे निरीक्षणांतीचे सांगणे अंगावर मोहोर उमटवणारे होते. तुमचे लेखन वाचल्यावर अनेकांना प्रश्न पडतो. जे यांना दिसते, समजते ते आपल्याला का नाही? हे सारे जंगल व त्यातल्या जीवसृष्टीशी तादात्म्य पावल्यावरच कळते. तुमचे हे समरस होणे विलोभनीय होते व आहे. जंगलाची ओळख करून देतानाच ते जगले पाहिजे ही तुमची आरंभापासूनची कळकळ. प्रत्येक व्यासपीठावर तुम्ही ती व्यक्त करत राहिला पण सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने त्याकडे कधीच गांभीर्याने बघितले नाही. विदर्भाचा निरोप घेताना सुद्धा तुमची हीच भावना होती.

जिल्हा कोणताही असो, तिथल्या जंगलातील गावे, दऱ्याखोऱ्यांची नावे अजूनही तुमच्या ओठावर रुळलेली. तुम्ही जे केले ते वनखात्यातल्या प्रत्येकाने करायला हवे. तेच त्यांचे कर्तव्य आहे पण दुर्दैवाने आज या खात्याला त्याचा पूर्ण विसर पडलेला. तुमचे संशोधन, लेखन ही खरे तर वनखात्याची पुंजी. त्यामुळे या खात्याने तुमच्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते. तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायला हवा होता. या उतारवयात तुमचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी होती. पण नोकरशाहीच्या चक्रात मश्गूल झालेल्या या खात्याकडून तेही घडले नाही. ही उपरती त्यांना तुम्ही विदर्भ सोडल्यावर झाली. दोन चार समित्यांवर घेणे, एखाद दुसऱ्या कार्यक्रमाला बोलावणे यापलीकडे या खात्याने तुमच्यात रस दाखवला नाही. आज तर सरकारी पातळीवरच संशोधन, अभ्यास, हद्दपार झाला आहे. वनसेवेत येणारे सारे सरकारी बाबू झाले आहेत. तुम्ही मात्र निवृत्तीनंतरची तीन दशके लोटूनही जंगलाच्या प्रेमात आहात. वार्धक्याची पोकळी कायम अंगावर येणारी असते. पत्नी व मुलगी गेल्यावर आता काय, असा प्रश्न जेव्हा तुमच्यासमोर उभा ठाकला तेव्हा तुमच्या अनेक परिचितांनी धावाधाव करून वध्र्याच्या हिंदी विद्यापीठात तुम्हाला जागा मिळवून दिली. तिथल्या अनवट वातावरणात सुद्धा तुमची लेखनकला व संशोधन बहरत राहिले. याला तपस्वीपण नाही तर आणखी काय म्हणायचे? निसर्गाप्रतीची अशी अविचल निष्ठा जोपासणारे तुम्ही एकमेव आहात. त्यामुळे तुमचे जाणे साऱ्यांच्या जिव्हारी लागणारे आहे. जंगल व त्यातील जीवसृष्टी हिरा असेल तर त्याची खरी पारख तुम्ही आम्हाला करून दिली. हे उपकार कधीही विसरता येणारे नाहीत. आयुष्यात अनेकदा नागमोडी वळणे येत असतात. तुम्हीच ओळख करून दिलेल्या जंगलातील वाटा तर अशाच वळणदार असतात. तुमच्या उतारवयात नाईलाजाने हे स्थलांतराचे वळण आले. आता जंगल नसलेल्या सोलापुरात तुमची साधना अशीच बहरत राहील यात शंका नाही. आम्ही मात्र तुमच्या कायम ऋणात राहू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 1:34 am

Web Title: writer maruti chitampalli left nagpur for solapur zws 70
Next Stories
1 आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
2 खासगी शिकवणी वर्गाची दहा हजार कोटींची उलाढाल ठप्प
3 सहाशे विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका
Just Now!
X