21 September 2020

News Flash

भाषा समृद्धीसाठी अनुवादक अकादमीच्या पर्यायावर विचार का नाही?

साहित्य अकादमीप्राप्त लेखक प्रफुल्ल शिलेदार यांचा सवाल

लेखक प्रफुल्ल शिलेदार

साहित्य अकादमीप्राप्त लेखक प्रफुल्ल शिलेदार यांचा सवाल; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : कुठलीही कविता जितकी सर्जनशील असते तितक्याच क्षमतेचे सर्जनशील कार्य अनुवादाद्वारेही घडत असते. अनुवादाच्या माध्यमातून राज्य आणि देशाच्या सीमा ओलांडून जे जे काही चांगले आणि वाचनीय आहे ते वाचकांच्या पदरी टाकले जाते, परंतु दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात शासन व साहित्य संस्थांनाही अनुवादाचे महत्त्व पुरेशे कळलेले नाही. भाषा व संस्कृतीच्या समृद्धीसाठी महाराष्ट्रात अनुवादक अकादमीसारख्या पर्यायावर अद्यापही विचार का झाला नाही हा खरा प्रश्न आहे, असे मत अनुवादासाठी नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे कवी, कथाकार व अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. या भेटीत शिलेदार यांनी राज्य, देश व जगभरातील अनुवाद चळवळीवर भाष्य केले सोबतच वर्तमान वाङ्मयीन स्थितीवरही प्रकाश टाकला. शिलेदार म्हणाले, अनुवादातून लेखकाचे भान आणि ज्ञान समृद्ध होत असते. अपरिचित भाषा आणि संस्कृतींमधील संवाद घडवण्यासाठी तसेच इतर भाषिक समाजाच्या जगण्याचा अर्थ समजून घेण्यासाठी अनुवाद हा उत्तम पर्याय आहे, परंतु एकएकटय़ाने या क्षेत्रात अपेक्षित यश साध्य करता येणार नाही. त्यासाठी शासन आणि मोठय़ा साहित्य संस्थांच्या स्तरावर काहीतरी ठोस कार्य झाले पाहिजे. मुंबईतील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे या दिशेने सकारात्मक कार्य होत आहे. याच धर्तीवर अनुवादक अकादमीसारख्या पर्यायांवर विचार व्हायला हवा. या अकादमीद्वारे मराठीतील साहित्य इतर भाषेत व इतर भाषेतील सकस साहित्य मराठीत येण्यासाठी प्रयत्न व्हावे. त्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद केली जावी. अनुवादकांच्या निवास, भोजन, प्रवासाची व्यवस्था या अकादमीने करावी. मोठय़ासाहित्य संस्थांनी अशा अकादमीचे पालकत्व स्वीकारावे. तेव्हाच तुकारामाची गाथा सर्वदूर पोहोचेल आणि शेक्सपिअर मराठीतील नव्या पिढीला उत्तमरित्या समजावून सांगता येईल. विदेशात विशेषत: पाश्चिमात्य देशात अनुवादावर गांभीर्याने कार्य सुरू असते. यासाठीचा सर्व खर्च तेथे सरकार करते. आपल्याकडे याबाबत अद्यापतरी पाटी कोरी आहे. भाषाप्रेम नुसते उत्सवी असून चालणार नाही. भाषा-भाषांचे जाळे मजबूत करायचे असेल तर भाषा टिकवण्याचा प्रयत्न हा प्राधान्याचा विषय असला पाहिजे. एक संवेदनशील वाचक म्हणून  मला ही गोष्ट सारखी खुणावत होती. पुढे हीच संवेदनशीलता कवितेत रूपांतरित झाली. स्वत:च्या कविता, कथांसोबतच मी अनुवादाच्या दिशेने वळलो. नंतर इंग्रजी साहित्याने आकर्षित केले. मागील २७ वर्षांपासून लिखाणाचा हा प्रवास सुरूच आहे.

.. म्हणून ‘संशयाआत्मा’ निवडले

कवी ज्ञानेंद्रपती यांच्या कवितेचा बाज निराळाच आहे.

ग्रामीण बोलीभाषेतील प्रतिमा ते इतक्या सहजतेने प्रमाण भाषेत गुंफतात की वाचणारा स्तब्ध राहतो. ज्ञानेंद्रपती हे निराला आणि नागार्जुन यांच्या उदात्त संवेदनशील परंपरतेली कवी आहेत. इतिहास, परंपरा आणि आधुनिक सभ्यताचे संमिश्र मिश्रण हे त्यांच्या कवितेतील जमेच्या बाजू आहेत. त्यांची कविता वाचताना ती वाचकाच्या सर्वागात झिरपत जाते. मला या कवितेचे प्रचंड प्रभावित केले. हिंदीतले हे बावनकशी सोने आपल्या मातृभाषेत यावे, यासाठी मी संशयाआत्मावर काम सुरू केले. या कामाची दखल साहित्य अकादमीसारख्या मानाच्या पुरस्कारने घेतली गेली, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.

मूळ शब्दकृती व अनुवादालाही ‘साहित्य अकादमी’

कवी ज्ञानेंद्रपती यांच्या संशयाआत्मा या काव्यसंग्रहालाही ‘साहित्य अकादमी’ने गौरवण्यात आले आणि आता त्यांच्या कवितांच्या मराठी अनुवादालाही ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे असे पहिल्यांदा घडले आहे. याचे श्रेय अर्थातच या काव्यसंग्रहाची शैली, मनाला थेट भिडणारा आशय आणि वरवरच्या आशयाच्या पलीकडे जाऊन वर्तमान सामाजिक, सांस्कृतिक वास्तवावरील निर्भीड भाष्याला आहे, याकडेही  प्रफुल्ल शिलेदार यांनी लक्ष वेधले.

वैचारिक साधम्र्य असेल तरच अनुवाद करा

कुठल्याही शब्दकृतीचा अनुवाद करताना त्या शब्दकृतीला आकार देणाऱ्या मूळ कवीला त्यातून नेमके काय सांगायचेय, हे आधी नीट समजून घेतले पाहिजे. ही काळजी न घेता पुढे गेलो तर कवीच्या कल्पनेतील मूळ अर्थाला धक्का लागण्याची भीती असते. अनुवाद केवळ शब्दश: नको तर त्या कवितेवरचे अनुवादकाचे ते अभ्यासी भाष्य असले पाहिजे आणि याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या कवीची कविता आपण अनुवादित करतोय त्याचे विचार व भूमिका आधी आपल्याला पटली पाहिजे. त्या कवीशी आपले वैचारिक साधम्र्य साधले जात असेल तरच त्याच्या कवितेचा अनुवाद करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला प्राप्त होत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:22 am

Web Title: writer prafull shiledar visit loksatta office
Next Stories
1 वाळू तस्करांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला
2 कुख्यात पवन मोरयानीला सिनेस्टाईल अटक
3 अश्लील चित्रफीत तयार करून आठ लाख लुबाडले
Just Now!
X