‘मेडिकल’मध्ये तीन वर्षांत १०० रुग्णांवर झाला अभ्यास

‘बोन टय़ुमर’ (हाडांचा टय़ुमर)चे वेळीच निदान ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. देशाच्या बहुतांश भागात आजही ‘बोन टय़ुमर’चे प्राथमिक स्तरावर निदान होण्याची संख्या कमी आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या ‘क्ष-किरणशास्त्र’ विभागात २०११ ते २०१३ या तीन वर्षांत येथील १०० बोन टय़ुमरच्या रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. त्यात ‘क्ष-किरण’च्या विविध तपासणीतून प्राथमिक स्तरावरच या आजाराचे निदान शक्य असल्याचे पुढे आले. ही नोंद ‘इंटरनॅशनल जनरल ऑफ सायंटिफिक रिसर्च’मध्येही झाली आहे.

मानवी शरीरातील हाडांमध्ये पसरणारा व न पसरणारा टय़ुमर हे ‘बोन टय़ुमर’चे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. या आजाराला चार वर्गामध्ये असल्याबाबतची तपासणी ‘क्ष-किरणशास्त्र’तील ‘सीटी स्कॅन’, ‘एमआरआय’, ‘एक्स-रे’ या विविध तपासणीसह पॅथॉलॉजीकल तपासणीतूनही केली जाते. सध्या क्ष- किरण तपासणीतून या आजाराचा संशय निर्माण झाल्यावर या रुग्णाच्या हाडामध्ये बारीक सुईतून नमुने पॅथॉलॉजीमध्ये तपासल्यावर या आजाराचे अचूक निदान केले जाते. ‘बोन टय़ुमर’बाबत ‘क्ष-किरण’च्या उपकरणांवर केल्या जाणाऱ्या तपासणीला किती अचूक मानावे, याबाबत वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांमध्येही वेगवेगळे मतप्रवाह बघायला मिळत होते.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या क्ष-किरणशास्त्र विभागाच्या डॉ. रमेश पराते यांनी या विषयावर अभ्यासाचा निर्णय घेतला. त्याकरिता मेडिकलमध्ये बोन टय़ुमरच्या सन २०११ ते २०१३ दरम्यान आढळलेल्या १०० रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. अभ्यासात त्यांना ‘क्ष-किरण’वर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ८१ टक्के रुग्णांचे निदान अचूक झाल्याचे निदर्शनात आले, तर पॅथॉलॉजीकल तपासणीत या आजाराचे निदान हे ९६.९ टक्के अचूक असल्याचे पुढे आले. एफएनएसी (फाईन निडल एस्पेरेशन सायटोलॉजी)च्या तपासणीतही ८६.३ टक्के निदान अचूक आल्याचे पुढे आले.

अभ्यासात ‘क्ष-किरण’च्या ‘एक्स-रे’, ‘सीटी स्कॅन’, ‘एमआरआय’च्या मदतीने बोन टय़ुमरचे निदान शक्य असल्याचे पुढे आले. या निदानानंतर या रुग्णाची पॅथॉलॉजीकल तपासणी केल्यास आजाराबाबत १०० टक्के खात्री पक्की होत असल्याचेही पुढे आले.  अभ्यासानुसार एकूण मेडिकलमध्ये आढळलेल्या १०० रुग्णांमध्ये २८ टक्के रुग्ण हे ११ ते २० या वयोगटातील असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली, तर ६१ ते ७० वयोगटातील रुग्णांची संख्या ही २६ टक्केच्या जवळपास असल्याचे पुढे आले. आढळलेल्या रुग्णांमध्ये पुरुषांच्या मानाने महिलांची संख्या जास्त राहत असल्याचेही या अभ्यासात पुढे आले. या अभ्यासाकरिता डॉ. रमेश पराते यांना डॉ. तिलोत्तमा पराते व डॉ. शशिकांत माने यांची मदत मिळाली.

त्वरित आजाराचे निदान झाल्यास गुंतागुंत टळते

अभ्यासात रुग्णाच्या ‘बोन टय़ुमर’ असलेल्या हाडावरील भागात सूज असल्याचे पुढे आले आहे. त्यात पायावरील आजाराची संख्या सर्वाधिक आहे. हा आजार ‘क्ष-किरण’च्या विविध तपासणीत शोधणे शक्य आहे. त्यानंतर या रुग्णाची त्वरित पॅथॉलॉजीकल तपासणी केल्यास या आजाराची खात्री १०० टक्के होण्यास मदत होते. पहिल्या टप्प्यात आजाराचे निदान झाल्यास रुग्णावर अचूक उपचार होऊन पुढील गुंतागुंत टळते. तेव्हा कुणाही व्यक्तीच्या हाडावर सूज दिसल्यास त्याने जवळच्या शासकीय रुग्णालयात वा तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्याची गरज आहे.

– डॉ. रमेश पराते, क्ष-किरणशास्त्र तज्ज्ञ व उपवैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर</strong>

chart