News Flash

अबब..चहाचे तब्बल ६५ प्रकार अन् तेही आरोग्यवर्धक!

या व्यवसायात त्याला त्याचा भाऊ कीर्त आणि मित्र अविनाशकुमारची साथ लाभली. 

(संग्रहित छायाचित्र)

अविष्कार देशमुख

तरुण अभियंत्याचे ‘टीव्हॉल्युशन’ जोरात; खाऊ गल्लीत रोज रंगते ‘चाय पे चर्चा’

तुम्ही जर आयटी पार्कच्या खाऊ गल्लीत गेलात तर एका छोटय़ा दुकानासमोर तुम्हाला हमखास गर्दी बघायला मिळेल. युवकांसोबतच ज्येष्ठांची येथे ‘चाय पे चर्चा’ दररोज रंगते. येथील ‘टीव्हॉल्युशन’ या दुकानात नागपुरात कुठेच मिळणार नाही असे तब्बल ६५प्रकारचे आरोग्यवर्धक चहा-कॉफी  मिळते. याची सध्या शहरभर चर्चा आहे.

अभियंता असलेले हेमंत शिवहरे हे ‘टीव्हॉल्युशन’ चे संचालक आहेत. त्याचा भाऊ कीर्त शिवहरे एमबीए करतो आहे, तर मित्र अविनाश कुमार एमसीएचा विद्यार्थी आहे. या तिघांनी मिळून आयटी पार्कजवळ चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दोन वर्षांपूर्वी वायसीसी अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर हेमंतने नागपुरात नोकरी शोधण्यास सुरुवात केली. मात्र, अनेक आयटी कंपनीत  प्रयत्न करूनही यश आले नाही.  त्यानंतर त्याने हैदराबाद येथे एका खासगी संस्थेत काही काळ नोकरी केली. मात्र  वेतन कमी असल्याने तो परत नागपूरमध्ये आला व व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. काहीतरी वेगळे करायचे त्याच्या मनात होते. भारतात सर्वाधिक पिले जाणारे पेय म्हणून चहाची ओळख आहे. या क्षेत्रात काही वेगळे करता येईल का, याचा विचार त्याने सुरू केला. सुरुवातीला घरीच चहावर विविध प्रयोग  केले. चहाच्या विविध चवींचा लोकांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यावर  त्याने चहा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहरात कुठे आणि किती प्रकारचे चहा मिळतात आणि त्याचे दर याचा अभ्यास हेमंतने  केला. आयटी पार्कशेजारी  खाऊ गल्लीत व्यवसाय सुरू केला. चहा आरोग्यवर्धक कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले. ऑग्रेनिक चहाचे फायदे लोकांना पटवून दिले.  लोकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्यवसायात त्याला त्याचा भाऊ कीर्त आणि मित्र अविनाशकुमारची साथ लाभली.

कुटुंब, मित्रांचे सहकार्य

कोणताही व्यवसाय करायचा असल्यास त्यासाठी भांडवल लागते.  सर्वसामान्य कुटुंबातील  हेमंतपुढे सुद्धा हा प्रश्न होता. वडिलांनी यासाठी मदत केली. कुटुंब आणि मित्रांच्या सहकार्याने दुकान आणि मेन्यू कार्ड  तयार केले. चहाची नावे ठरवली. कुठल्याही प्रकारचे ब्रॅिडग केले नाही. कुतूहलाने लोक आले आणि चहाचे एवढे प्रकार बघून भरावून गेले. दर्जात कुठेही कमी पडायचे नाही असे ठरवल्याने लोकांचा विश्वास बसला. सात महिन्यातच  शहराच्या विविध भागातून केवळ चाय पिण्यासाठी नागपूरकर येथे पोहचतात.

चहाचे प्रकार

चॉकलेट, इलायची, अद्रक, गुलाब, लवंग, काळे मिरे, हळदी, तुळस, लिंबू, पुदीना, हर्बल अशा अनेक विविध प्रकारचे आरोग्यवर्धक चहा हेमंतच्या दुकानात असतात. नागपूरकर  मोठय़ा आवडीने त्याचा आस्वाद घेतात. अगदी दहा रुपयांपासून तर पन्नास रुपयांपर्यंत  चहा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, चहाचे ६५ प्रकार हेमंतने स्वत: विकसित केले. ‘टीव्हॉल्युशन’ हा देखील चहाचा प्रकार आहे.

‘‘अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र पदरी निराशा आली. त्यामुळे काही वेगळे करायचे ठरवले. खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड  होतीच. त्यामुळे जे नागपुरात नाही असे काही करण्याचे ठरवले. भारतीयांमध्ये प्रत्येक वयोगटात चहा आवडीचा आहे. त्यामुळे यातच अधिक प्रकार कसे करता येथील यावर भर दिला. अल्पकाळाताच नागपूरकरांनी या प्रयोगाला पसंती दर्शवली. आईच्या हातचा मसाला आणि माझ्या मेहनतीमुळे मी आज एका अभियंत्यापेक्षा अधिक कमवतो याचा अभिमान आहे.’’

– हेमंत शिवहरे, संचालक टीव्हॉल्युशन, आयटी पार्क नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:53 am

Web Title: young engineers tea volution loud
Next Stories
1 बाळ उशिरा बोलेल असा समज बाळाच्या भविष्यासाठी धोक्याचा
2 मेडिकल, मेयोत उष्माघाताच्या रुग्णांची लपवाछपवी!
3 दिल्ली, मुंबई, पुण्याचे विमानभाडे भडकले
Just Now!
X