• नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन करणार
  • भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांचे मत
  • लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा अहवाल दिल्यानंतर त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. उमेदवारी देण्याबाबत पक्षाचे धोरण ठरले असून मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केले.

सुधाकर कोहळे यांनी शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने मतदान केंद्रापासून कार्यकत्यार्ंची फळी आणि वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या असून त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. उमेदवारी मिळावी अशी प्रत्येक पदाधिकाऱ्याची इच्छा असली तरी पक्षाची कोअर कमिटी याबाबत निर्णय घेत असते. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार असल्यामुळे त्या दृष्टीने कोअर कमिटीने चाचपणी सुरू केली आहे. विद्यमान नगरसेवकांच्या कामाचा अहवाल मागविण्यात येणार आहे त्यानुसार त्यांच्या कामाचे मूल्यमापन बघून उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कुणाच्याही वशिल्याने उमेदवारी देण्याचा प्रश्न नाही आणि भाजपमध्ये तशी पद्धत नाही. प्रामाणिकपा, कर्तृत्व, गुणवत्ता आणि जनतेमध्ये सहभाग या बाबींचा विचार केला जाणार असून त्यावर निवड केली जाणार आहे, असे कोहळे म्हणाले.

निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचा ‘मास्टर प्लान’ तयार आहे आणि त्या दृष्टीने कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. काँग्रेससारखी स्थिती भाजपमध्ये नाही. आमचा राजकीय पक्ष असला तरी एक परिवार आहे. कार्यकत्यार्ंमध्ये नाराजी असेल तर ती दूर केली जाते. पक्षामध्ये शहरात १८ हजार कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेने केलेली विकास कामे घेऊन जनतेसमोर जात आहोत. त्यामुळे जनता विकासाला प्राधान्य देईल. काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्ष निवडणूक असल्यामुळे विरोधाला विरोध करीत आहेत. महापालिका निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा जिंकू आणि महापालिकेत तिसऱ्यांदा सत्ता भाजपची राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  काँग्रेसने जे ४० वर्षांंत केले नाही, ते महापालिकेने १० वषार्ंत करून दाखविले आहे.  २५ सप्टेंबरला दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ५०० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरपासून ‘घर घर चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. काँग्रेसमध्ये सामाजिक पाया नाही. पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये सुसूत्रता व एकवाक्यता नाही. विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी दृष्टी नाही. केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी काँग्रेस भाजपवर आरोप किंवा टीका करीत असेल तर जनता त्याकडे गंभीरपणे पाहत नाही. दक्षिण नागपूरचा आमदार झाल्यानंतर जवळपास गेल्या दोन वर्षांत ४० ते ४५ कोटींची कामे करण्यात आली आहेत. या मतदारसंघात शासकीय रुग्णालयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. शिवाय अनधिकृत लेआऊटची समस्या आहे. मात्र, आता विकास कामे सुरू आहेत. दक्षिण नागपूर टँकर आणि आरक्षणमुक्त करणार आहे. तीर्थस्थळाचा विकास केला जात आहे. ताजबाग आणि सक्करदरा तलावाच्या विकासासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असेही कोहळे म्हणाले.

‘सेनेने शहाणपण शिकवू नये’

शहरातील रस्त्यावरील खड्डय़ावरून शिवसेना टीका करीत असेल तर शिवसेनेला त्याबाबत बोलण्याचा काहीच अधिकार नाही आणि त्यांनी शहाणपण शिकवू नये. अन्य शहरातील त्यातही मुंबईतील खड्डय़ांची स्थिती बघता नागपूर शहरात त्या तुलनेत ५ टक्के खड्डे नाहीत. अन्य शहराच्या तुलनेत नागपूर शहराचे रस्ते चांगले आहेत. रस्त्यांची कामे सुरू आहेत. खराब रस्ते येत्या चार महिन्यांत चांगले केले जातील. काँग्रेस किंवा शिवसेनेने खड्डय़ांवरून राजकारण करू नये आणि त्यांनी विकासाच्या बाबतीत आम्हाला काही सांगू नये. त्यांनी मुंबईतील रस्त्यांची स्थिती बघावी आणि सुधारणा करावी. उगाच नागपुरात लक्ष देऊ नये, असा सल्ला कोहळे यांनी दिला.

गेल्या काही दिवसांत पक्षामध्ये गुन्हेगारी वृत्तीचे लोक असल्याचा प्रचार होत असताना तो चुकीचा असून पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार आहे. जे होते त्यांना पक्षाने ताकीद दिली आणि काहींना पक्षातून निलंबित केले आहे. शहर अध्यक्ष म्हणून काम करताना गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांना स्थान देण्यात आले नाही आणि असे असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षातील नेते सक्षम आहेत.