शवविच्छेदनानंतर खून की आत्महत्या स्पष्ट होणार

कंपनीच्या कामानिमित्त नागपुरात आलेल्या एका पनवेलच्या तरुणीचा वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडमध्ये संशयास्पद मृतदेह सापडला. महिलेचा मृत्यू हा नैसर्गिक आहे किंवा तिचा खून किंवा आत्महत्या आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. अल्का प्रभाकर वलनूज (२८) रा. पनवेल असे मृत तरुणीचे नाव आहे.

मृत तरुणी ही नेस्ले कंपनीत शेफ व कार्यकारी व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. नागपुरातील कारखान्याची पाहणी करण्यासाठी ती येथे आली होती. मंगळवारी सकाळी तिने हॉटेल प्राईडमध्ये प्रवेश केला आणि ११८ क्रमांकाच्या खोलीत थांबली होती. कारखान्यातील तीन युनिटची पाहणीही केली. त्यानंतर रात्री ती आपल्या खोलीत होती. रात्रीच्या सुमारास तिच्या आईवडिलांनी तिच्याशी संपर्क साधला असता तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ती झोपली असावी, असा त्यांचा समज झाला. बुधवारी सकाळी पुन्हा तिच्या आईवडिलांनी संपर्क साधला. मात्र, तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी हॉटेलच्या स्वागतकक्षात संपर्क साधला आणि खोलीत जाऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाने दरवाजा ठोठावला, परंतु आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या कार्डने दरवाजा उघडला. तेव्हा आतमध्ये तरुणी मृतावस्थेत होती. त्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाने सोनेगाव पोलिसांना माहिती दिली. सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. तिला फिट येण्याचा आजार होता, असे सांगण्यात येते, परंतु हा मृत्यू, आत्महत्या की खून आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पांडे यांनी दिली.