शहरात दोन बळी; ६६ नवीन बाधितांची भर

नागपूर :  पारडी परिसरातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या तरुणालाही करोना असल्याचे पुढे आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. याशिवाय उपराजधानीत आज बुधवारी दिवसभरात नवीन ६६ बाधितांची भर पडली असून मेडिकलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी एका ६३ वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला.

शांताराम (बदलेले नाव) रा. अन्नपूर्णा सोसायटी, पारडी, नागपूर असे आत्महत्या केलेल्या ३० वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. त्याच्या घराजवळच त्याचे आई-वडील वेगळे राहतात. शांतारामला मद्याचे व्यसन होते. तो एका सिमेंट गोदामात हातमजुरीचे काम करत होता. टाळेबंदीकाळात त्याला  काही वेळा काम मिळत नव्हते. मंगळवारी सकाळी तो घरात झोपला असताना त्याची पत्नी दोन मुलांसह शांतारामच्या आई-वडिलांकडे गेली. दुपारी  एक जण शांतारामला जेवण करायला बोलावण्यासाठी घरी आला असता शांताराम  गळफास घेऊन लटकलेला दिसला. त्याने आरडा-ओरड करताच शेजारच्यांनी तेथे धाव घेतली. पोलिसांना माहिती कळताच तेही घटनास्थळी पोहचले.  मृतदेह मेयो रुग्णालयात हलवण्यात आला. त्याचे नमुने  तपासणीला पाठवण्यात आले. बुधवारी सकाळी अहवाल सकारात्मक आला. तातडीने महापालिकेला सूचना देत या मृतदेहाचे निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  या तरुणाच्या संपर्कातील सर्वाना विलगीकरणात घेण्यात आले आहे.  दुसऱ्या घटनेत यवतमाळच्या एक अत्यवस्थ रुग्ण मेडिकलमध्ये दाखल होता. या ६३ वर्षीय वृद्धाचाही करोनाने मृत्यू झाला. या वृद्धाचा प्रवासाचा इतिहास होता. चाचणीत त्याला करोना असल्याचे निदान झाले. १५ जुलैला त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या ३९ वर पोहचली आहे.

या भागात नवीन रुग्ण आढळले

पारडीत १ रुग्ण, डायमंड नगर १, गोधनी १, बारी चौक (मोमीनपुरा) आणि महात्मा फुले बाजार २, ज्योती नगर (खदान) १, जुनी मंगळवारी १, गोळीबार चौक १, नाईक तलाव- बांगलादेश ४, जेल परिसर १, गोकुल अपार्टमेंट (नवदुर्गा सोसायटी, न्यू नरेंद्रनगर) १, भाऊसाहेब सुर्वे नगर १, शिवाजी नगर २, पी. एन. टी. कॉलोनी (मानकापूर) १, वसंत नगर १, मेडिकल १, शांती अपार्टमेंट १, सुयोग नगर १, मिनीमाता नगर (पारडी) १, हसनबाग २, भारत नगर १, एलेक्सिस रुग्णालय ३ रुग्ण, शहर आणि ग्रामीणच्या काही भागातही बाधित आढळले.

सक्रिय बाधितांची संख्या नऊशे पार

उपराजधानीत प्रथमच उपचार सुरू असलेल्या सक्रिय करोना बाधितांची संख्या ९११ वर पोहचली आहे. त्यात मेयोतील १२५ रुग्ण, मेडिकलचे १७२, एम्सचे ५१, कामठीतील रुग्णालयातील ३२, खासगी २३, आमदार निवासातील कोविड केअर सेंटरचे २४०, मध्यवर्ती कारागृहातील १८४ रुग्णांचा समावेश आहे.  रात्री उशिरापर्यंत ८४ रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याच्या मार्गावर होते.

संतोष आंबेकरसह चार कैदी मेयोत

मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी रात्री गुंड संतोष आंबेकर याच्यासह चार गंभीर गुन्ह्य़ातील कैद्यांना मेडिकलला आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मेयो रुग्णालयातील कैद्यांसाठी केलेल्या विशेष वार्डात हलवण्यात आले. संतोष आंबेकरला करोनाची लक्षणे असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, मेयोला दाखल करण्यासाठी हलवलेल्या कैद्यांमध्ये दोन नक्षल कृत्याशी संबंधित कैद्यांचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सोनेगाव पोलीस ठाण्यातील शिपायाला करोना

सोनेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाला करोनाची लागण झाली. या कर्मचाऱ्याचा तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या दोन पोलीस हवालदारासह ११ कर्मचाऱ्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले.  यापूर्वी विशेष शाखेतील महिला पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना तर आर्थिक गुन्हे शाखेतील एका महिला सहाय्यक निरीक्षकाला करोनाची लागणी झाली होती.

७९ टक्के शहर, १८ टक्के ग्रामीणमधील रुग्ण

नागपुरात आजपर्यंत आढळलेल्या एकूण २,५७१ बाधितांपैकी ७९ टक्के जण (२०३०) हे शहराच्या विविध भागातील आहेत. १८ टक्के बाधित (४५९ रुग्ण) ग्रामीणचे आहेत.  ३ टक्के बाधित (९६ रुग्ण) हे नागपूर बाहेरून येथे उपचाराला आलेले आहेत. बुधवारी दिवसभऱ्यात नवीन ३५ जणांसह आजपर्यंत  एकूण १,६२० जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

१३ नवीन परिसर प्रतिबंधित

शहरात पुन्हा १३ परिसर प्रतिबंधित करण्यात आले. यात नेहरूनगर झोनअंतर्गत भांडे प्लॉट, धंतोली झोनअंतर्गत रतन अपार्टमेंट ४ गणेशपेठ, लकडगंज झोनमध्ये तलमले लेआऊट ओमनगर भरतवाडा, लकडगंज झोनअंतर्गत नेताजीनगर श्रीराम चौक जवळ, आशीनगर झोनमध्ये रिपब्लिकन नगर, धंतोली झोनअंतर्गत द्वारकापुरी हावरापेठ, आशीनगर झोनअंतर्गत गल्ली क्रमांक ११ बंदेनवाझनगर, नागपूर, नेहरूनगर झोनअंतर्गत आदर्श नगर दिघोरी राम मंदिरजवळ, सतरंजीपुरा झोनअंतर्गत गुप्ता चौक बांगलादेश, पाठराबे वाडी, प्रभाग क्रमांक ५, गांधीबाग झोनअंतर्गत कोसारकर मोहल्ल्याचा समावेश आहे.