वातावरणात अनपेक्षित बदल घडण्याचे चित्र जगभर; आज जागतिक हवामान दिन

निसर्गचक्र आता पूर्णपणे पालटले असून वातावरणात कधीही, कोणतेही अनपेक्षित बदल घडून येतात. वातावरणातील बदलाची ही स्थितीत भारतातच नव्हे, तर परदेशातही आहे. म्हणूनच हवामान बदल व पर्यावरण हे विषय जागतिक पातळीवर चर्चिले जात आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची कृषी व्यवस्था हवामानातील बदलांवर आधारित आहे. तरीही भारतात हे क्षेत्र कायम दुर्लक्षिले गेले आणि तरुण पिढी हवामान बदलाच्या अभ्यासाकडे वळायला तयार नाही. त्या तुलनेत अमेरिकेत मात्र यातील नवनव्या प्रयोगात तरुण पिढीचा सहभाग अधिक आहे.
गारपीट, वादळ याचा सामना भारतीयांना करावा लागतो. त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्याचा सामना अमेरिका आणि इतर देशांना करावा लागतो. मात्र, या देशांमध्ये हवामान बदलाचे संकेत वेळोवेळी देणारी आधुनिक यंत्रणा आहे. ही यंत्रणा तयार करणारी पिढी तरुण आहे. भारतात अजूनही हवामानक्षेत्रात जुनीच यंत्रणा वापरली जात आहे. त्यामुळेच हवामानाचे अंदाज चुकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ढग, वारा, गारा, याची स्थिती दर्शविणारे डॉप्लर रडार भारतात आहेत, पण अध्र्याहून अधिक जुने आणि बंदच आहेत. हवामान बदलाच्या कोणत्याही स्थितीला जागतिक तापमान वाढीचे कवच पांघरूण मोकळे होण्याची आणखी एक सवय भारतीय हवामान खात्याला आहे. या सर्व गोष्टींना हवामान खातेच जबाबदार नाही, तर नवनवे प्रयोग करणारी तरुण पिढी या क्षेत्रात नसल्यामुळेसुद्धा हे परिणाम दिसून येत आहेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेऊनही या क्षेत्रात फारशा संधी राहिलेल्या नाहीत, हे जगजाहीर आहे. तरीही या देशातील तरुण पिढी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या मागे लागली आहे. संशोधन प्रत्येक क्षेत्रात आहे आणि हवामानाच्या क्षेत्रातही ते आहे. किंबहुना, हवामानाचा अभ्यास हा संशोधनाचाच एक भाग आहे. त्यामुळे या क्षेत्रात जितके खोलवर शिरण्याचा प्रयत्न केला जातो तितके ते क्षेत्र अधिक उलगडत जाते. हवामान बदलाची सध्याची स्थिती पाहता या क्षेत्रात उत्तम करिअर करण्याची संधी आहे. तरीही भारतातील तरुण पिढी या क्षेत्राकडे वळायला तयार नाही. अमेरिका आणि इतर देशात संशोधनाचे आणि जिज्ञासेचे मुळ विद्यार्थीदशेतच रुजवले जाते, पण भारतात हे होतच नाही. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाचा जेवढा प्रचार आणि प्रसार आहे, तेवढा संशोधनाचा नाही. भारतीय हवामान खात्यात मनुष्यबळाची कमतरता असताना, या कृषिप्रधान देशाची मदार हवामानातील बदलावर अवलंबून असतानासुद्धा तरुणाईचा सहभाग त्यात नाही, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
‘फारच कमी विद्यापीठात अभ्यासक्रम’
हवामानाचे क्षेत्र हे संशोधनाचे क्षेत्र आहे आणि भारतात संशोधनाकडे वळणारी तरुण पिढी फार कमी आहे. यासाठी केंद्र सरकारने शिष्यवृत्ती जाहीर केली, पण त्याचाही उपयोग तरुण पिढीला करता आलेला नाही. हवामानाचे क्षेत्र हे दुर्लक्षित असून यातही करिअर असते, हे अजूनही तरुण पिढीला ठावूक नाही. शाळेत मूळ विषय असतात, पण हवामान हा विषय नाही. विद्यापीठात वेगवेगळे अभ्यासक्रम असतात, पण हवामानाच्या संदर्भात फार कमी विद्यापीठात अभ्यासक्रम आहे. तरुण पिढी या क्षेत्रामागे न वळण्याचे हेसुद्धा एक कारण आहे, असे मत सोमलवार निकालसचे विज्ञान आणि संगणक विज्ञानचे प्रा.दामोदर ठोंबरे यांनी व्यक्त केले.