प्रशासनाचे अमानवी कृत्य; प्रसारमाध्यमांच्या दबावानंतर अधिकारी नरमले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाने रात्री मृतदेह शवविच्छेदनगृहाबाहेर टाकून कुलूप लावून निघून गेले. बराच वेळ हा मृतदेह शवविच्छेदनगृहाबाहेरच पडून होता. मेडिकल प्रशासनाच्या या अमानवी कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून आज शेकडो नागरिकांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना घेराव घालून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली.

आकाश प्रल्हाद शेंडे (२०) असे मृत मुलाचे नाव आहे. तो सुभाषनगर परिसरात सायकल स्टोर्स चालवायला. काल त्याचा मृतदेह अंबाझरी तलावात सापडल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठविण्यात आला. आकाशने आत्महत्या केली नसून त्याचे अपहरण करून खून करण्यात आला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

घरातील तरणाबांड मुलगा मरण पावल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. संध्याकाळी उशिरा आकाशचे शवविच्छेदन पूर्ण झाले. त्यामुळे संध्याकाळी त्याचा मृतदेह घरी घेऊन जाण्यात कोणताही अर्थ नव्हता. शिवाय, घरात अतिशय गंभीर वातावरण असल्याने आकाशच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह रात्रभर शवविच्छेदनगृहातच ठेवण्याची विनंती न्यायवैद्यक शास्त्र विभागाला केली, परंतु शवविच्छेदनगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे काहीही न ऐकता मृतदेह शवविच्छेदनगृहाबाहेर काढला आणि दारे बंद करून घेतली. त्यानंतर आकाशचे नातेवाईक विभागाचे प्रमुख डॉ. मुखर्जी आणि अधिष्ठाता अभिमन्यू निसवाडे यांना भेटले, परंतु त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. रात्री उशिरापर्यंत हे मृतदेह उघडडय़ावर पडून होते.अखेर आकाशच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क केला. प्रकरण प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर नाईलाजास्तव मेडिकल प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनगृहाच्या आत घेतला, परंतु ते उघडय़ावरच ठेवले. त्यामुळे आज सकाळी नातेवाईक गेले तेव्हा मृतदेहाला दरुगध सुटला होता. आकाशच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वत्र दरुगध पसरला होता. मेडिकल प्रशासनाच्या या कृत्याचे पडसाद सर्वत्र उमटले. त्यामुळे आकाशचे वडील प्रल्हाद शेंडे, काका शंकर शेंडे, आणि युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठात अभिमन्यू निसवाडे यांना आज दुपारी १ वाजता घेराव घातला. त्यापूर्वी त्यांनी मृतदेह प्रतापनगर पोलीस ठाण्यासमोर नेला होता, परंतु पोलिसांची कोणतीही चूक नसल्याने त्यांनी मोर्चा मेडिकलकडे वळविला. या मोर्चामुळे मेडिकलमध्ये बराच वेळ तणावाचे वातावरण होते. युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके, कुणाल पुरी, रोहित खरवार, निलेश चंद्रिकापुरे, हेमंत कातुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

यावेळी संतप्त जमावाने अधिष्ठाता अभिमन्यू निसवाडे यांना न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुखर्जी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी मेडिकल डोक्यावर घेतले. शेवटी डॉ. निसवाडे यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.