15 November 2019

News Flash

कामठीत भरदिवसा तलवारीने हत्या

काही दिवसांपूर्वी त्याचा भाऊ सूरज सिद्धार्थ सोमकुंवर याला चोरीप्रकरणी अटक करण्यात आली.

खुनाचे घटनास्थळ आणि मृत

नागपूर : चोरीच्या वादातून कामठीत दिवसढवळ्या दोघांनी मिळून तलवारीने सौरभ सिद्धार्थ सोमकुंवर (१८) रा. लुंबिनी या तरुणाचा भोसकून खून केला. याप्रकरणी रोशन रमेश सकतेल (३४) आणि राजू छोटेलाल सकतेल (४५) रा. सैलाबनगर, कामठी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींविरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तरुण सौरभ हा गणेश फोटो स्टुडिओत काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा भाऊ सूरज सिद्धार्थ सोमकुंवर याला चोरीप्रकरणी अटक करण्यात आली. तो सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे. दरम्यान, आरोपींचा भाऊही चोरीच्या प्रकरणात अटकेत आहे. सूरज आणि आरोपींचा भाऊ हे मिळून चोरी करायचे. अनेकदा सूरजला अटक केल्यानंतर पोलीस त्याच्या घरी चौकशी करायचे. त्यावेळी सौरभ हा आरोपींच्या भावाकडे चोरीचे सामान सापडेल, अशी माहिती द्यायचा. याचा राग आरोपींच्या मनात होता. सौरभची प्रकृती ठीक नसल्याने तो दुपारी दुकानातून घरी यायचा. हे माहीत असल्याने आरोपींनी त्याला ठार मारण्याची योजना आखली. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सौरभ दुकानातून घरी जाण्यासाठी मोपेडने निघाला असता आरोपींनी त्याचा पाठलाग केला. समतानगर परिसरातील भुयार पुलाच्या परिसरात त्याच्यावर पाठीमागून तलवारीने सपासप वार केले. गळा, छाती, पोट व पाठीवर जवळपास १६ वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पंधरा दिवसांपूर्वीही हल्ला झाला होता

पंधरा दिवसांपूर्वीही सौरभवर हल्ला झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. ड्रॅगन पॅलेस परिसरातून जात असताना हा हल्ला झाला होता. त्यावेळी गोंडवाना झुडुपात लपून त्याने स्वत:चा बचाव केला होता. पण, मंगळवारी पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला पण तो बचावला नाही.

First Published on August 21, 2019 5:17 am

Web Title: youth killed in nagpur nagpur murder zws 70