राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष व भाजपचे नगरसेवक मुन्ना यादव यांच्या गुंडगिरी व दहशतीविरुद्ध सूरज लोलगे या तरुणाने शनिवारपासून संविधान चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शनिवारी दुपारी १.३० वाजतापासून त्याच्या उपोषणाला सुरुवात झाली असून लोकांच्या तक्रारी स्वीकारून यादव यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी लोलगे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पन्नासवर युवक होते.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधान परिषदेत यादव यांच्या गुंडगिरीविरुद्ध व त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ांबद्दल उल्लेख केल्यानंतर यादव यांचे प्रकरण नव्याने चर्चेत आले. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या यादव यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहशतीचा वापर करून दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील दलपतशाहनगर व पंचदीप नगर येथील झोपडपट्टय़ा खाली करून घेण्याचा आरोप आहे. या झोपडपट्टय़ांमधील पीडित नागरिक या उपोषणात सहभागी होणार होते. मात्र, अनेकांना बांधकाम व्यावसायिकाकडून कामावरून काढून टाकण्याची धमकी मिळाली. त्यामुळे अनेकजण आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही, असा आरोप लोलगे यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात खोटी माहिती देणे, शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून जनसंपर्क कार्यालय थाटणे, चिंचभवनमधील १०० एकर जागेवर अवैधपणे ताबा घेणे यासह इतरही गंभीर आरोप आहेत. मात्र, पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत नाही, असा आरोपही लोलगे यांनी केला आहे.

भाजपच्या दक्षिण-पश्चिम मंडळाचा नवीन शोध
नागपूर महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने काही विरोधक भाजपच्या नेत्यांवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करीत आहेत. मुन्ना यादव यांच्यावर केवळ राजकीय गुन्हे दाखल असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत दिलेली माहिती खरी असून त्यांच्या गृह विभागाने यादवांच्या गुन्ह्य़ाबाबत दिलेल्या माहितीवर विश्वास नसल्याचा तर्क भाजपच्या दक्षिण-पश्चिम मंडळाने शनिवारी पत्रकार परिषदेत मांडला. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भोयर म्हणाले, महापालिकेत १५ वर्षे वेगवेगळी पदे भूषवताना यादव यांच्यावर एकही आरोप झाला नाही. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष झाल्याने हा प्रकार काही लोकांना खूपत आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधकांनी नारायण राणेंसह इतर काही लोकांना पुढे करीत यादव यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला. त्यांच्यावरील गुन्हे राजकीय स्वरुपाचे आहेत. आरोप करणारा सूरज लोलगे याच्यावर बलात्कारासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून त्याची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत छोटू बोरीकर, सचिन कराळकर, अश्विन जिचकार, सुरेंद्र पांडे, रमेश शिनगारे, गोपाल बोहरे, वानखेडे उपस्थित होते.