राज्यात गाजलेल्या युग मुकेश चांडक या आठ वर्षीय चिमुकल्याचे खंडणीसाठी अपहरण करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्या. भूषण गवई आणि न्या. स्वप्ना जोशी यांनी अशा गुन्हेगारांना समाजात परतण्याची संधी देता येणार नाही, असे मत नोंदवून या फाशीवर शिक्कामोर्तब केले. एकाच प्रकरणात दोन गुन्हेगारांच्या फाशीवर शिक्कामोर्तब होण्याची ही नागपूर खंडपीठाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

१ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी युग शालेय बसमधून घरासमोर उतरल्यावर राजेश उर्फ राजू धनालाल दवारे (२३, रा. वांजरी लेआऊट, कळमना) आणि अरविंद अभिलाष सिंग (२१, प्रीती लेआऊट, नारा रोड, जरीपटका) यांनी त्याचे अपहरण केले. त्याला दुचाकीवरून प्रथम आपल्या घरी आणि त्यानंतर नागपूरपासून २७ कि.मी.वरील पाटनसावंगी परिसरात नेले. तेथे लोणखरी परिसरातील एका नाल्यात त्याचा निर्घृण खून करून त्याला तेथेच वाळूत पुरले. युगला संपविल्यावर आरोपींनी डॉ. महेश चांडक यांना भ्रमणध्वनी करून प्रथम १० कोटी आणि नंतर ५ कोटींची खंडणी मागितली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबरला आरोपींनी पोलिसांसमोर अपहरण आणि खुनाची कबुली दिली होती. त्यानंतर २ सप्टेंबरच्या रात्री आरोपींनी युगचा पुरलेला मृतदेह पोलिसांना दाखविला होता.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी केला होता. प्रकरणाची सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमक्ष झाली. सरकारी पक्षाने ५० साक्षीदार तपासले. साक्षीपुरावे आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने ४ फेब्रुवारीला दोन्ही आरोपींना फाशी ठोठावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, तर सरकारतर्फे फाशीची शिक्षा निश्चित करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.