राम भाकरे

करोनामुळे बंद असलेली नाटय़गृहे सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र कठोर नियमांमुळे विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीवर नाटक सादर करणे अवघड असल्याने कोटय़वधींची उलाढाल थांबणार आहे.

साधारणत: दिवाळीनंतर भाऊबिजेच्या रात्रीपासून झाडीपट्टीच्या नाटकांचा पडदा उघडतो. तत्पूर्वी महिन्या दोन महिन्यांआधीपासूनच झाडीपट्टी रंगभूमीचे केंद्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील वडसा देसाईगंज येथे नाटकांच्या तारखा निश्चित केल्या जातात. परंतु यंदा वडसा येथे सगळेच सुनसान आहे. करोनाच्या भीतीने अजूनही तेथील कलावंतांच्या तालमी सुरू झालेल्या नाहीत.

झाडीपट्टीत एकूण ५५ कंपन्या असून, चार हजारच्या जवळपास कलावंतांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. साधारणत: एका नाटकाचा खर्च ६० ते ७० हजार रुपये असतो. २८ संस्थांनी करोनाच्या भीतीने या वर्षी नाटक न करण्याचा निर्णय घेतला. काही कंपन्या स्वत:हून आयोजकांना फोन करून नाटकांच्या तारखा ठरवत आहेत. मात्र त्यांना पोलिसांची परवानगी नाही. परिणामी, झाडीपट्टी रंगभूमीवरील कोटय़वधींची उलाढाल थांबणार असून त्याचा फटका तेथील निर्मात्यासह रंगमंचावरील व पडद्यामागील कलावंतांना बसणार आहे.

राज्य सरकारने ठरवून दिलेल्या चौकटीत झाडीपट्टीची नाटके होऊ  शकत नाहीत. झाडीपट्टीच्या एकेका प्रयोगाला तीन ते चार हजार प्रेक्षक असतात. हे प्रेक्षक दाटीवाटीने बसून रात्रभर नाटक बघतात. सहा फुटांवर प्रेक्षकांना बसवले तर ते निर्मात्याला आणि कलावंतांना परवडणारे नाही.

– राजेश चिटणीस, कलाकार

सहा महिन्यांपासून बंद असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवर नाटक सादर करण्यास परवानगी मिळाली असली तरी शासनाच्या नियमांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय करोनाची भीती आहेच. त्यामुळे आमच्या कंपनीने नाटक न सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

– शेखर डोंगरे, कलाकार