‘स्मार्ट’ म्हणून विकसित होत असलेल्या नागपूरच्या सौंदर्यात मेट्रो रेल्वेच्या ‘झिरो माईल्स’ स्थानकामुळे आणखी भर पडणार असून ही इमारत शहरातील आगळी वेगळी इमारत म्हणून ओळखली जाण्याची शक्यता आहे. येथे तयार करण्यात येणारे ‘हेरिटेज ट्रॅक’ हे सुद्धा नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे असणार आहे.

मेट्रो रेल्वेच्या शहरातील एकूण ३८ किलोमीटरच्या प्रवासात एकूण ३८ स्थानके असणार आहेत. यापैकी सर्वात भव्य स्थानक  सीताबर्डीतील मेट्रो जंक्शन आणि त्यानंतरचे तेवढेच भव्य आणि आकर्षक असे झिरो माईल स्थानक असणार आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनाने याचे संकल्प चित्र जारी केले आहे. त्यानुसार इमारतीचा क्रमांक लागतो. यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्नही निकाली निघाला आहे. देशाचा मध्यबिंदू असणाऱ्या झिरो माईल स्मारकाचे महत्त्व अबाधित राखूनच इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी व्यवस्थापनाने तयारी सुरू केली आहे. झिरो माईल स्मारकाजवळ संरक्षक कठडे लावण्यात आले असून तेथे लवकरच काम सुरू होणार असल्याचे मेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) आपटे यांनी सांगितले. फ्रेन्च आर्किटेक्ट कंपनीकडून झिरो माईल आणि सीताबर्डी या स्थानकाचे डिझाईन तयार करून घेण्यात आले आहे. सुरुवातीला इमारत बांधकाम केले जाणार असून त्यानंतर हेरिटेज ट्रॅकच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सीताबर्डी जंक्शनहून निघालेली मेट्रो झिरो माईलकडून पुढे कामठी मार्गाकडे जाणार आहे. सध्या खापरी, नवीन विमानतळ, अंबाझरी स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या एकूण जागेपैकी आतापर्यंत ८३ टक्के जागा संपादित करण्यात आली आहे.

सध्या नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनची व्याप्ती वाढली आहे. शासनाने महामेट्रोची स्थापना केली असून त्यात नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन ही कंपनी विलीन करण्यात आली आहे. यापुढे नागपूर मेट्रो रेल्वेचे सर्व कामे ही महामेट्रोच्या माध्यमातूनच केली जाणार आहेत. सध्या जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. तेथे रूळ टाकण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल. मिहानमध्ये कॉनकॉर डेपोजवळ रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकामही अंतिम टप्प्यात आहे. हा पूल मेट्रो रेल्वे व्यवस्थापनानेच बांधलेला आहे. वर्धा मार्गावरील विमानतळ चौक ते नीरी या दरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. छत्रपती उड्डाण पुलाच्या जागेवर होणारा नवीन पूल तसेच मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ होणाऱ्या पुलाच्या बांधकामाकडे सध्या सर्वाचे लक्ष आहे. वर्धा मार्गावरच आणखी एक चार पदरी उड्डाण पुलाचे बांधकाम केले जाणार आहे.

माईल्स स्थानकाचे संकल्पचित्र