पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्य़ांत करोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मन:स्ताप होत असतानाच या भागात १ जानेवारी २०२० ते १७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत एकही ‘स्वाईन फ्लू’चा मृत्यू झाला नसल्याचे पुण्याच्या आरोग्य विभागाच्या नोंदीतून पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांना आंशिक दिलासा मिळाला आहे.

नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागासह पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्य़ांत प्रत्येक वर्षी कमी- अधिक प्रमाणात स्वाईन फ्लूचे नवीन रुग्ण आढळतात. यापैकी काहींचा उपचारादरम्यान मृत्यू होत होतो. वर्ष २०१८ मध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांत स्वाईन फ्लूचे १९ रुग्ण आढळले होते. पैकी उपचारादरम्यान चंद्रपूरला २, नागपुरात १ अशा एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर २०१९ मध्ये सहा जिल्ह्य़ांत ३९० रुग्णांची नोंद झाली होती. त्यातील ४६ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण रुग्णांतील ३८८ रुग्ण आणि ४४ मृत्यू नागपूर शहरातील होते. परंतु १ जानेवारी ते १७ नोव्हेबर २०२० या काळात सहा जिल्ह्य़ांमध्ये केवळ ६ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. परंतु त्यातील एकाचाही मृत्यू झाला नसल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूच्या तपासण्या होत असलेल्या प्रयोगशाळेला करोनाच्या प्रयोगशाळेत बदलण्यात आले आहे. तेव्हा हे रुग्ण कमी होण्याला स्वाईन फ्लूची तपासणी कमी होणे, हे कारण आहे काय? असा प्रश्नही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. २०२० मध्ये पूर्व विदर्भात केवळ ६ रुग्णांची नोंद होण्यासह एकही मृत्यू न झाल्याच्या वृत्ताला आरोग्य उपसंचालक कार्यालयानेही दुजोरा दिला आहे.