उपराजधानीत ‘झोमॅटो’कडून पहिला प्रयोग; पर्यावरणवाद्यांकडून निर्णयाचे स्वागत

महेश बोकडे, नागपूर</strong>

ऑनलाईन खाद्यपदार्थाचे दुचाकीद्वारे वितरण करणारे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी शहरात जागोजागी दिसतात. मात्र, झोमॅटो कंपनीने सायकलद्वारे ही सेवा देण्याचा पहिलाच प्रयोग शहरात सुरू केला आहे. यामुळे हिरवे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपुरातील पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा या कंपनीचा विश्वास आहे.

उपराजधानीत ऑनलाईन खाद्यपदार्थाची विक्री आता चांगलीच वाढली आहे. झोमॅटो, स्विगी, ऊबेर इट्स या तीन  प्रमुख कंपन्यांकडून ही सेवा दिली जात आहे. खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी मोठय़ा संख्येने वितरण प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत. सध्या शहरातील झोमॅटो या कंपनीकडे सर्वाधिक वितरण प्रतिनिधी आहेत. त्यांच्या नियुक्तीपूर्वी आधी उमेदवारांकडे मोटारसायकल किंवा मोपेड हे दुचाकी वाहन आहे काय? हे बघितले जायचे. आता या निकषांना फाटा देत झोमॅटो या कंपनीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी सायकलवरही खाद्यपदार्थाचे वितरण सुरू केले आहे. त्यानुसार सायकलवरील वितरण प्रतिनिधींना खाद्यपदार्थ निर्माण करणाऱ्या हॉटेलपासून दोन किलोमीटरचा भाग दिला जातो. याहून अधिक अंतर असलेल्या ठिकाणचे वाटप दुचाकीद्वारे करण्यात येत आहे.

सायकल संस्कृती वाढण्यास मदत

उपराजधानीत सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढावी म्हणून अनेक जण कार्यरत आहेत. ते सायकल हे साधन व्यायामासह शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे, हेही विविध उपक्रमांतून पटवून सांगतात. झोमॅटोच्या या उपक्रमातून शहरात सायकल संस्कृती वाढण्यास मदत होईल, असा आशावाद पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.

‘‘झोमॅटोकडून शहरात सायकलवर विविध खाद्यपदार्थ वितरित करण्याला सुरुवात झाली आहे. त्यास नागरिकांची पसंतीही मिळत आहे, पण या विषयावर मला बोलण्याचे अधिकार नाहीत. अधिक माहितीसाठी दिल्लीतील झोमॅटोच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधणे योग्य ठरेल.’’

– विपुल सिन्हा, झोमॅटो.

पहिल्या टप्यात २५० सायकलींचा वापर

झोमॅटो कंपनीकडे शहरात १ हजार विक्री प्रतिनिधी आहेत. यातील सायकलवरद्वारे सेवा देणारे २५० प्रतिनिधी नियुक्त होणार असून त्यातील पन्नास जणांची नियुक्तीही झाली आहे. सध्या सायकलवर पदार्थ वितरित करणारे सर्वाधिक प्रतिनिधी धरमपेठ, रामदासपेठ परिसरात आहेत. या उपक्रमामुळे दुचाकी नसलेल्या तरुणांनाही सायकलच्या मदतीने रोजगाराची संधी मिळणार आहे.