महेश बोकडे

केंद्र सरकारने करोनाबाबत प्रत्येक जिल्ह्य़ांची लाल, नारिंगी आणि हिरव्या क्षेत्रामध्ये विभागणी केली आहे. त्यात विदर्भातील अमरावती जिल्ह्य़ांत सर्वाधिक १० करोनाचे मृत्यू असतांनाही ते  नारिंगी झोनमध्ये तर चंद्रपूरमध्ये एकही रुग्ण नसतांनाही या जिल्हाचा समावेश नारिंगी झोनमध्ये केल्याने ही यादीच वादात सापडली आहे.

शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत विदर्भात करोनाचे ३४९ रुग्ण नोंदवले गेले. त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १० मृत्यू हे एकटय़ा अमरावतीतील आहेत. यातील पाच जणांचा बळी घरीच गेला असून त्यानंतर झालेल्या त्यांच्या तपासणीत त्यांना करोना असल्याचे निदान झाले. एवढी धक्कादायक स्थिती असतांनाच सरकारने अमरावतीला लालऐवजी नारिंगी क्षेत्रामध्ये टाकले आहे. दुसरीकडे प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्ह्य़ात आजपर्यंत एकही करोनाग्रस्त आढळला नाही. मूळ चंद्रपूर जिल्ह्य़ांतील निवासी पत्ता असलेले एक दाम्पत्य इंडोनेशियाहून नागपूरला परतल्यावर त्यांना लागण झाल्याचे पुढे आले होते. ते येथून एकदाही चंद्रपूरला गेले नव्हते.  ते २१ एप्रिलला करोनामुक्त झाले. त्यांना चंद्रपूर जिल्ह्य़ात न पाठवता खबरदारी म्हणून वनामती येथे विलगीकरणात ठेवले आहे. त्यानंतरही चंद्रपूरचा ग्रीन ऐवजी नारिंगी क्षेत्रामध्ये समावेश झाल्याने अधिकारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. विदर्भातील नागपूर (१५० रुग्ण, २ मृत्यू), यवतमाळ (८० रुग्ण), अकोला (३८ रुग्ण, ३ मृत्यू) हे जिल्हे रेड झोनमध्ये दाखवले आहेत. अमरावती (५३ रुग्ण, १० मृत्यू), बुलढाणा (२४ रुग्ण, १ मृत्यू), भंडारा (१ रुग्ण) हे जिल्हे नारिंगी क्षेत्रामध्ये तर अद्याप एकही रुग्ण न आढळलेले वर्धा, गडचिरोली हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. गोंदिया, वाशिम या जिल्ह्य़ांत प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यावर ते दोन्ही जिल्हे करोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर येते एकही नवीन रुग्ण न आढळल्याने हे जिल्हेही हिरव्या क्षेत्रामध्ये आहेत. या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.