तीन जागा काँग्रेसच्या ताब्यात, एक राष्ट्रवादीच्या वाटय़ाला

नागपूर :  जिल्हा परिषदेत पक्षाला स्पष्ट बहुमत असल्याने काँग्रेसने विषय  समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही मित्र पक्ष राष्ट्रवादीला फक्त एक सभापतीपद देऊन उर्वरित तीन पदे स्वत:कडे ठेवली. आज झालेल्या निवडणुकीत चारपैकी चारही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्ववाखालील महाविकास आघाडीने जिंकल्या. यापूर्वी  झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने  राष्ट्रवादीची उपाध्यक्ष पदाची मागणी  फेटाळली होती. आता एक सभापतीपद देऊन  त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीने  दोन सभापतीपदाची मागणी केली होती, हे येथे उल्लेखनीय. जिल्हा परिषदेत बांधकाम, आरोग्य, अर्थ, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन अशा चार समित्या आहेत.  महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला बोढारे,

समाज कल्याण सभापतीपदी काँग्रेसच्या नोमावली माटे, शिक्षण, अर्थ, कृषी सभापतीपदी काँग्रेसचे तापेश्वर वैद्य विजयी झाले. बहुमत नसतानाही भाजपने या निवडणुकीत त्यांचे उमेदवार उभे केले होते. ४३ विरुद्ध १५ मतांनी महाविकास आघाडीने बाजी मारली. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसलीदार शेखर गाडगे यांनी काम बघितले.

निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात जल्लोष केला. यावेळी  युवक व क्रीडा मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, सुरेश भोयर आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसने एक सभापतीपद दिल्याने आम्ही समाधानी

आहोत.  सदस्यांमध्ये कुठलीही नाराजी नाही. ग्रामीण भागाचा विकास करण्याचे आमचे ध्येय आहे त्यानुसार काम करणार आहे. – चंद्रशेखर कोल्हे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी  कुठलाच फाम्र्युला ठरला नव्हता. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जो निर्णय झाला त्यानुसार जिल्हा परिषदेत पुन्हा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. – राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.