यवतमाळ: शासकीय कार्यालयातील विभागांतर्गत पदोन्नती आदी प्रक्रिया ही अत्यंत किचकट समजली जाते. त्यामुळे शासकीय नोकरीत लागल्यानंतर पदोन्नती वगैरे होत राहील, अशा मानसिकतेत कर्मचारी काम करतात. मात्र येथील जिल्हा पुरवठा विभागातील शिपाई संवर्गातील १० कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सुखद धक्का दिला. या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्या हाती तासाभरात थेट गट ‘क’ संवर्गातील पदोन्नतीचा आदेश देण्यात आला. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव अधिकाऱ्यांनाही आनंद देवून गेले.
जिल्हा पुरवठा विभागातील विविध कार्यालयात महसूल विभागातील कर्मचारी लिपीक संवर्गात उसनवारीने काम करत होते. या कर्मचाऱ्यांना महसूल विभागाने परत बोलावल्याने यवतमाळ, नेर, आर्णी, झरी, दारव्हा, केळापूर, दिग्रस या तालुक्यात जागा रिक्त झाल्या. या जागा पुरवठा विभागाच्या आस्थापनेतील शिपाई पदावरील १० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देवून भरण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवला. सर्व शासन आदेश आणि कायदेशीर बाबी पडताळून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अनिता पाटील, अमोल मंगाम, अभिजित करमनकर, सीमा मराठे, आदित्य कांडेलकर, रूपाली मडावी, जयश्री पचारे, रविशेखर कांबळे, मधुरा राजूरकर आणि वर्षा कनाके या दहा शिपायांना कनिष्ठ लिपीक म्हणून पदोन्नतीचे आदेश दिले.
हेही वाचा… विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात बनवली ७ हजार किलोची खिचडी; मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून विश्वविक्रम!
गुरूवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी डॉ. आशिया आणि पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी ही प्रक्रिया सुरू केली आणि सायंकाळी साडेचार वाजता या कर्मचाऱ्यांना त्यांचे पदोन्नती आदेश सुपूर्द केले. प्रशासनाच्या या कार्य तत्परतेने हे कर्मचारी चांगलेच भारावले. इतक्या जलदगतीने एखाद्या विभागातील शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपीक म्हणून पदोन्नती देण्याची ही पहिलीच घटना असावी, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात व्यक्त होत आहे.
विभागाचे काम सुरळीत होईल
पदोन्नतीचे आदेश स्वीकारल्यानंतर नवनियुक्त लिपीक जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांना भेटायला आले. एरवी उभे राहून साहेबांचे आदेश, सूचना ऐकणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी चक्क समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले, तेव्हा सरकारी सेवेतील पदोन्नतीची किमया या कर्मचाऱ्यांनीही जाणली. यावेळी कर्मचाऱ्यांना प्रमाणिकपणे काम करण्याच्या ‘टिप्स’ही अधिकाऱ्यांनी दिल्या. पुरवठा विभागातील पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती याच विभागात लिपीक संवर्गात झाल्याने मनुष्यबळ वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणी विभागाचे काम सुरळीत होईल, असे पुरवठा अधिकारी पवार म्हणाले.
