scorecardresearch

४२.५ टक्के भागात दररोज १० ते २० चिमण्यांचे दर्शन; अकोल्यात ऑनलाइन चिमणी गणना

अकोल्यातील ऑनलाइन चिमणी गणनेमध्ये एक दिलासादायक बाब समोर आली. शहरातील ४२.५ टक्के भागात दररोज १० ते २० चिमण्यांचे दर्शन होत असल्याचा निष्कार्ष काढण्यात आला.

Online Chimney Calculation in Akola
अकोल्यात ऑनलाइन चिमणी गणना

अकोला : काँक्रिटच्या जंगलात चिमण्यांचे दर्शन दुर्लभ झाले. मात्र, अकोल्यातील ऑनलाइन चिमणी गणनेमध्ये एक दिलासादायक बाब समोर आली. शहरातील ४२.५ टक्के भागात दररोज १० ते २० चिमण्यांचे दर्शन होत असल्याचा निष्कार्ष काढण्यात आला. निसर्गकट्टा, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १९ मार्च या कालावधीत अकोला जिल्ह्यात ऑनलाइन चिमणी गणना करण्यात आली.

या गणनेत ५०० लोकांनी सहभाग नोंदवला. यातून ज्या भागात झाडांचे प्रमाण जास्त, तसेच काँक्रिटचे प्रमाण कमी आहे, त्या भागात चिमण्यांचे प्रमाण जास्त असल्याचे निर्दशनास आले. या गणनेत ९ प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाच्या अनुषंगाने नागरिकांची मते जाणून घेतली. या ऑनलाइन सर्व्हेमध्ये ५ ते १० चिमण्या १५ टक्के, १० ते २० चिमण्या ४२.५ टक्के, ५० ते १०० चिमण्या २२.३ टक्के भागात दररोज दिसतात. केवळ तीन टक्के भागात चिमणी दिसतच नाही. ९० टक्के लोकांनी चिमण्यांसाठी घरासमोर पाण्याचे भांडे ठेवल्याचे समोर आले, तर ७९.८ टक्के लोकांनी दाण्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> कर्मचारी संपावर आज तोडगा निघणार? निमंत्रक समितीला चर्चेचे निमंत्रण, पण…

जिल्ह्यातील चिमण्यांची स्थिती काय व त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाय करावे, यासाठी सर्व्हे घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळला. माणसाच्या जन्मापासून निसर्गाशी नाते जोडण्याचे काम चिऊताई करते. त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्याच्या उद्दिशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी ९४.५ टक्के नागरिकांनी चिऊताईला हक्काचा निवारा देण्याचे ठरविले आहे. निसर्गकट्टाच्या माध्यमातून यावर्षी २०० कृत्रिम घरटे लावण्याचे नियोजन सर्व्हेच्या माध्यमातून केले, अशी माहिती निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी दिली. चिमणी गणना यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्य. डॉ. सुचिता पाटेकर, निसर्गकट्टाचे डॉ. मिलिंद शिरभाते, संदीप वाघडकर, प्रदीप किडीले, मनोज लेखनार, डॉ. संतोष सुराडकर, प्रेम अवचार, गौरव झटाले, अजय फाले व अजिम शेख यांनी परिश्रम घेतले. पावसाळ्यात सर्वात कमी दिसतात ४० टक्के भागात बाराही महिने चिमण्या दिसतात. उन्हाळा व हिवाळ्यात २४.५ टक्के, तर पावसाळ्यात सर्वात कमी १८.९ टक्के चिमण्या दिसतात.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 14:43 IST

संबंधित बातम्या