चंद्रपूर : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील देलनवाडी येथे घडली. लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथी ‘ब’ चा विद्यार्थी कुमार ईशान सत्यपाल आत्राम असे मृताचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान हा आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी उठला होता. आंघोळ आटोपून तो शाळेचा गणवेश परिधान करून तयारी करत असतानाच, सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो कोसळला. पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून आई-वडिलांनी त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

ईशान हा केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळातही तितकाच हुशार होता. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे तो शिक्षक आणि वर्गमित्रांचा अत्यंत लाडका होता. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली जाण्याने शाळेतील शिक्षकांनाही धक्का बसला आहे. ईशानच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या (मंगळवार, २१ एप्रिल) लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अवघ्या १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या बातमीने पालकांमध्ये मोठी भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका उमलत्या फुलाचा असा आकस्मिक अंत झाल्याने देलनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ईशानच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि मोठा आप्तपरिवार असून, संपूर्ण ब्रह्मपुरी शहर आत्राम कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहे.