चंद्रपूर : हुंड्यासाठी पत्नीकडे तगादा लावून पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीस जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्ष कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रवींद्र मुरलीधर पारधी ( ४२ ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. विशेष म्हणजे, पत्नीने कंटाळून दोन मुलांसह विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली होती.
आरोपीचे २००८ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर आरोपी काही दिवस चांगला राहिल्यानंतर त्याला दारूची सवय लागल्याने तो पत्नीकडे पैशाची मागणी करायचा. पैसे न दिल्यास झगडा भांडण करून चारित्र्यावर संशय घेत होता. वारंवार होत असलेल्या पैशांच्या मागणीला कंटाळून पत्नीने बेलावाठी शेत शिवार परिसरात विहिरीत दोन मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मृतक महिलेच्या वडीलांने ब्रम्हपुरी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.]
हेही वाचा >>>गडचिरोली : “हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारा”, भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांचे फलकाद्वारे आवाहन
जिल्हा सत्र न्यायाधीश २ यांनी साक्षीदार व याेग्य पुराव्याच्या आधारे आरोपी पती रवींद्र मुरलीधर पारधी यास कलम ४९८ ( अ ) भादवी. मध्ये ३ वर्ष शिक्षा पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, कलम ३०६ भादवी मध्ये १० वर्षे शिक्षा पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा ठोठावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी केला. सरकार तर्फे ॲड. संदीप नागपुरे तर कोर्ट पैरवी म्हणून पो हवालदार रामदास कोरे, विजय ब्राह्मणे यांनी काम पाहिले.