अमरावती : भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त विठूमाऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली असताना एसटी महामंडळाच्या अमरावती विभागाने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सातही स्थानकांवरून जादा बसगाड्यांची सोय केली असून, यंदा एकूण १०० बसगाड्या भाविकांना घेऊन पंढरपूरकडे धावणार आहेत.
२५ ते ४ जून या कालावधीत पंढरपूरसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी जाणे-येणे करण्यासाठी आरक्षणाची सोय आहे. तसेच ग्रामीण भागांतील प्रवाशांना ग्रुप बुकिंगही करता येणार आहे. परतीच्या वेळी ६० बसची सोय द्वादशीला तसेच ४० एसटीची सोय पौर्णिमेला करण्यात आली आहे. यंदा चालक-वाहकांची नावे आणि मोबाईल क्रमांक ठळकपणे प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्याचा फायदा भाविकांना होणार असून त्यांचा परतीचा प्रवास सुलभ होणार आहे.




हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आर्थिक अनियमितता; बँकेच्या अध्यक्षांचा ‘हा’ आहे दावा
अमरावती विभागाकडे एसटी बसेसची संख्या मर्यादित असल्यामुळे भंडारा येथील डेपोतून अतिरिक्त २५ बसेस मागवण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षी अमरावती-पंढरपूर अशा ८२ बसेसने ८८ फेऱ्या केल्या होत्या. यंदा विभागातील अमरावती येथून १६, बडनेरातून (अमरावती) १४, दर्यापुरातून १३, परतवाडातून १२, वरुड येथून ११, चांदूर रेल्वे येथून १०, मोर्शीतून १२ व चांदूर बाजार १२ बसेस अशा सातही स्थानकांवरून एकूण १०० एसटी बस भाविकांना घेऊन पंढरपूरकडे निघणार आहेत.
८२० रुपये तिकीट दर
अमरावती-पंढरपूर वाशीम, परभणी मार्गे जाणाऱ्या एसटीचे तिकीट ८२० रु. आहे. त्याचप्रमाणे दर्यापूर-पंढरपूर, मूर्तिजापूर, परभणी मार्गे जाणाऱ्या एसटीच्या तिकीटाची किंमत ८०० रु., परतवाडा-पंढरपूर, अमरावती, परभणी मार्गे जाणाऱ्या एसटीचे तिकीट ८९५ रु., वरुड-पंढरपूर, अमरावती, परभणी मार्गे जाणाऱ्या बसचे तिकीट ९५० रु., चांदूर रेल्वे-पंढरपूर, अमरावती, परभणी मार्गे जाणाऱ्या बसचे तिकीट ८६० रु., मोर्शी-पंढरपूर, अमरावती, परभणी मार्गे जाणाऱ्या एसटीचे तिकीट ८९५ आणि चांदूर बाजार-पंढरपूर, अमरावती, परभणीमार्गे जाणाऱ्या बसचे तिकीट ८८० रु. आहे. प्रवासाचे एकूण टप्पे व अंतरानुसार तिकीटांचे दर कमी जास्त आहेत.