उदय सामंत यांचे युवा पिढीला आवाहन; विद्यापीठाचा १०९वा दीक्षांत सोहळा थाटात

नागपूर : ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्या नावानेही गट-तट निर्माण करण्याचे उद्योग सध्या काही लोक करत आहेत. स्वातंत्र्यानंतर आमच्याच नावाने असे गट पडतील असा विचारही कधी या महापुरुषांनी केला नसेल. मात्र, काही लोक महापुरुषांना गटा-तटात विभागून त्यांच्या नावाने राजकारण करीत आहेत. राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचे असे भांडवल करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०९ व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या दीक्षांत सोहळय़ात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे व व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. यावेळी उदय सामंत म्हणाले, १९१७ साली नवीन शैक्षणिक धोरण सर्वात आधी आणणारे छत्रपती शाहू महाराज होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण अनिवार्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्र कसा घडला हे आजच्या पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्यामध्येही गट-तट निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. महात्मा गांधी, सरदर पटेल, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, वि. दा. सावरकर यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचेच असे गट पडतील असा विचारही केला नसेल. महापुरुषांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना युवा पिढीने धडा शिकवावा असे आवाहन सामंत यांनी केले. यावेळी आपल्या देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्याच्यावर संशोधन करा व तो वारसा मिटवण्याच्या प्रयत्न करणाऱ्याचे प्रयत्न हाणून पाडा, असेही ते म्हणाले. यावेळी सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. चौधरी यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संचालन डॉ. मोईज हक आणि डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.

दोन सख्ख्या भावांना पीएच.डी.

विद्यापीठाच्या १०९ व्या दीक्षांत सोहळय़ाचे वैशिष्टय़ म्हणजे दोन सख्ख्या भावांना पीएच.डी. देण्यात आली. प्रदीप एस. चव्ख्णन इतिहास या विषयात आणि कॅप्टन सुजित एस. चव्हाण या दोन्हीं सख्ख्या भावांनी इंग्रजी विषयात आचार्य पदवी प्राप्त केली. दोन्ही भाऊ शेतकरी कुटुंबातून आहेत, हे विशेष.

स्वयंअध्ययनावर भर दिला

मी राष्ट्रीय सुरक्षा विषयात एल.एल.एम. करीत असून माझ्या कुटुंबातील पहिली वकील होणार आहे. लहानपणापासूनच फौजदारी कायद्याची विशेष आवड असल्याने हे क्षेत्र निवडले. अभ्यासाव्यतिरिक्त संगीत आणि प्रवासाची आवड आहे. करोनाच्या काळात स्वयंअध्ययनावर जास्त अवलंबून होते. त्याचाच परिणाम म्हणून चांगले गुण मिळाल्याचा आनंद आहे. वडील अरुण कुमार गुप्ता हे शाळेचे मुख्याध्यापक तर आई अंजली गुप्ता शिक्षिका आहे.

अपराजिता गुप्ता, सर्वाधिक सुवर्ण पदक विजेती.

कुलगुरूंना कानपिचक्या

विद्यापीठ गीतात लिहिलेल्या पहिल्या दोन ओळी वाचून काढत सामंत यांनी सध्याच्या वातावरणावर प्रकाश टाकून याची खरी गरज महाराष्ट्र आणि देशाला असल्याचे सांगितले. आज धर्म जात आणि पंथात देश विभागण्याचा प्रयत्न, भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते करण्याचा प्रयत्न करू नये. यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रतिज्ञेत नेहमी खरे बोला असे म्हटले. त्याचा उल्लेख करीत सामंत यांनी नेमके हे कुणासाठी म्हटले असा प्रश्न उपस्थित केला.

डॉ. लालवाणींना डी.लिट

या समारंभात मानवविज्ञान शाखेत डॉ. दयाराम लालवाणी यांना डी.लिट या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात आले. याशिवाय अपराजिता अरुणकुमार गुप्ता हिला सर्वाधिक ८ सुवर्णपदके व २ पारितोषिक, आरजू बेग हिला ७ सुवर्ण तर निधी अमर साहू, शुभांगी देविदास धारगावे आणि रूपाली हिवसे यांना ४ सुवर्ण व एक रौप्य पदक प्रदान करण्यात आले.

शिक्षक, पालकांच्या विश्वासामुळे यश

ग्रामीण भागातून येऊन नागपूरसारख्या शहरात शिक्षण घेणे तसे कठीण होते. मात्र, मधुकरराव वासनिक  पीडब्ल्यूएस महाविद्यालयातील प्रा. अमृता डोर्लिकर, प्रा. नागपुरे या शिक्षकांचे सहकार्य आणि पालकांच्या विश्वासामुळे हे यश मिळवता आले. वडील शिक्षक असल्यामुळे मलाही लहानपणापासून या क्षेत्रात आवड असल्याने भविष्यात शिक्षक बनायचे आहे. – शुभांगी धारगावे, चार सुर्वण पदक विजेती.