scorecardresearch

उपराजधानीत ‘सीएनजी’चा प्रतिकिलो दर ११६ रुपये; प्रति किलोमागे सहा रुपयांची दरवाढ

उपराजधानीत सीएनजी गॅसचे तीन पंप असून त्यातील केवळ एकाच पंपावर सीएनजी उपलब्ध आहे. दरम्यान, मंगळवारी सीएनजीच्या दरांमध्ये एचानक तब्बल सहा रुपयांची वाढ करण्यात आली.

cng and png price
संग्रहित

नागपूर : उपराजधानीत सीएनजी गॅसचे तीन पंप असून त्यातील केवळ एकाच पंपावर सीएनजी उपलब्ध आहे. दरम्यान, मंगळवारी सीएनजीच्या दरांमध्ये एचानक तब्बल सहा रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे सीएनजीचे प्रति किलो दर तब्बल ११६ रुपये नोंदवण्यात आले. हे दर महाराष्ट्रात किंबहुना देशात सर्वाधिक असल्याचा आरोप करत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

उपराजधानीत हरियाणा गॅस कंपनीकडून ‘सीएनजी’चा पुरवठा केला जातो. पूर्वी नागपुरात ११० रुपये प्रति किलो दराने वाहन धारकांना हे इंधन उपलब्ध केले जात होते. परंतु कंपनीने मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ६ रुपये किलो दराने दरवाढ केली. त्यामुळे आता नागपुरात सीएनजी चे दर प्रति किलो ११६ रुपयांवर पोहचले आहे. एवढे सीएनजीचे प्रति किलो दर कुठेही नसून नागपूरकरांकडून देशात सर्वाधिक दर का घेतले जातात? हा प्रश्न येथील ‘सीएनजी’ संवर्गातील चारचाकी वाहनधारक विचारत आहेत. या क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘एलएनजी’ गॅसच्या उपलब्धतेत अडचणी आहेत. त्यामुळे नागपुरात पुरवठादाराकडून ‘एलएनजी’ आणून त्याचे रूपांतरण ‘सीएनजी’मध्ये केले जाते. सध्या सीएनजीच्या पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण झाल्याने नागपुरात दोन पंप बंद पडले आहे. तर केवळ ऑटोमोटिव्ह चौकातील पंपावरच ‘सीएनज“ उपलब्ध आहे.

पेट्रोलपेक्षा ‘सीएनजी’ महाग

उपराजधानीत मंगळवारी ‘एचपी’ कंपनीचे साधे पेट्रोल १०६.०२ रुपये प्रति लिटर तर पाॅवर पेट्रोल १११.९४ रुपये प्रति लिटर या दराने ग्राहकांना दिले जात होते. ‘इंडियन ऑईल कंपनी’कडून हे पेट्रोल या दराहून प्रति लिटर दोन पैसे अधिक दराने दिले जात होते. तर ‘सीएनजी’चे मंगळवारी प्रतिकिलो दर ११६ रुपये असल्याने पेट्रोलहून ‘सीएनजी’चे दर जास्त असल्याचा अनुभव वाहन धारकांनी बोलून दाखवला. प्रत्यक्षात बऱ्याच शहरात पेट्रोलहून ‘सीएनजी’ स्वस्त असल्याचाही वाहनधारकांचा दावा आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-08-2022 at 10:22 IST
ताज्या बातम्या