वर्धा : शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे पुढील सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नियमित ३ फेऱ्या आणि विशेष २ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना अद्याप कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिरिक्त प्रवेश फेरी आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
१६ जुलैपासून अर्ज नोंदणी
या नवीन प्रवेश फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १६ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या कालावधीत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करणे, अर्ज भाग-१ मधील चुका दुरुस्त करणे आणि भाग-२ मधील महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना किमान १ आणि जास्तीत जास्त १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे बंधनकारक असून, मुलींसाठी राखीव महाविद्यालयांचे पसंतीक्रम गुणवत्तेनुसार दिले जातील. तसेच, कोटांतर्गत (व्यवस्थापन, इन-हाउस, अल्पसंख्याक) प्रवेशासाठी अर्ज करणे आणि पसंतीक्रम लॉक करण्याची प्रक्रियाही याच मुदतीत पूर्ण करावी लागेल.
२० जुलै रोजी गुणवत्ता यादी
विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या पसंतीक्रमानुसार १९ जुलै २०२६ रोजी डेटा प्रोसेसिंग व अलॉटमेंटची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर २० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता अधिकृत संकेतस्थळावर महाविद्यालयांची वाटप यादी (अलॉटमेंट लिस्ट) आणि कट-ऑफ यादी प्रदर्शित केली जाईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) द्वारे प्रवेशाची माहिती पाठवली जाईल. यासोबतच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनाही त्यांच्या लॉगिनमध्ये पात्र विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून दिली जाईल.
प्रवेश निश्चितीसाठी २२ जुलैपर्यंतची मुदत
महाविद्यालय अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, विहित शुल्क भरणे आणि प्रवेशाची पुष्टी (Proceed for Admission) करणे आवश्यक आहे. जर विद्यार्थ्याला मिळालेला प्रवेश नाकारायचा किंवा रद्द करायचा असेल, तर तशी नोंदणीही विद्यार्थ्याला स्वतःच्या लॉगिनमधून करता येईल. कनिष्ठ महाविद्यालयांनी देखील याच मुदतीत कोटांतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहेत.
२४ जुलै रोजी अंतिम यादी
प्रवेश निश्चितीची प्रक्रिया संपल्यानंतर २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ३ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांचे अंतर्गत कामकाज चालणार असून, त्यानंतर डेटा प्रोसेसिंग पूर्ण केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेनंतरही शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांचा तपशील २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केला जाईल.
महत्त्वाची सूचना
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ पासून सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये नियमितपणे सुरू होत आहेत. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वरील वेळापत्रकाचा सखोल अभ्यास करून दिलेल्या मुदतीतच आपली प्रवेश कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
