वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांना दिलासा देत विशेष फेरी-१ अंतर्गत प्रवेश निश्चित करण्यासाठी आता ०८ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच, मुलींसाठीच्या ‘विशेष फेरी-२’ चे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती

शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण ९,६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत तब्बल १४,७३,४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १०,७३,९७८ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.

विशेष फेरी-१ चा विचार करता, ४,८४,८६५ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करून सहभाग घेतला होता. त्यापैकी ३,९२,६९३ विद्यार्थ्यांना ३ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयांचे वाटप (अलॉटमेंट) करण्यात आले. यामध्ये विज्ञान शाखेसाठी १,९८,०६१, वाणिज्य शाखेसाठी ८९,७२२ तर कला शाखेसाठी १,०४,९१० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ७ जुलै २०२६ पर्यंत राज्यातील एकूण ३,२४,१०२ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केला असून, यात कॅप (CAP) अंतर्गत ३,१२,९८३ आणि कोट्यांतर्गत ११,११९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विभागनिहाय प्रवेशात पुणे विभाग (६४,७४९) आणि मुंबई विभाग (५७,४०४) आघाडीवर आहेत.

मुलींसाठी विशेष फेरी-२ चे वेळापत्रक

  • शिक्षण संचालनालयाने मुलींसाठीच्या विशेष फेरी-२ चे वेळापत्रकही जारी केले आहे:
  • ९ जुलै (दुपारी २ वा.) ते १० जुलै २०२६ (सकाळी १० वा.): रिक्त जागा प्रदर्शित करणे, नवीन नोंदणी आणि अर्जाच्या भाग-१ मध्ये दुरुस्ती करणे.
  • १० जुलै (सकाळी ११ वा.) ते ११ जुलै २०२६ (सायंकाळी ६ वा.): विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग-२ भरणे आणि लॉक करणे. (विद्यार्थ्यांना किमान १ व कमाल १० महाविद्यालयांचे विकल्प देता येतील).१३ जुलै २०२६ (सकाळी १० वा.): कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी (अलॉटमेंट) आणि कट-ऑफ यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल.
  • १३ जुलै (सकाळी ११ वा.) ते १४ जुलै २०२६ (सायंकाळी ६ वा.): विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा लागेल. १५ जुलै २०२६: राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये अधिकृतपणे सुरू होतील.

माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश

दुसऱ्या एका पत्राद्वारे, विभागीय शिक्षण उपसंचालकांना ८ जुलै (सायंकाळी ६ वा.) ते ९ जुलै २०२६ (दुपारी २ वा.) या काळात नव्याने कनिष्ठ महाविद्यालय/तुकडी समाविष्ट करणे, माहिती अद्ययावत करणे व रिक्त जागा समर्पित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणताही पात्र विद्यार्थी किंवा महाविद्यालय या प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी अधिकृत पोर्टल https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी किंवा ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे