FYJC Admission / वर्धा : राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस आता गती आली आहे. पहिल्या फेरीतील नोंदणी प्रक्रिया आटोपली. आता विद्यार्थ्यास प्रवेश निश्चित करायचा आहे. त्या संदर्भात नवा टप्पा आता असा राहणार आहे.

प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती जाहीर केली आहे. राज्यातील एकूण ९,५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू असून, आतापर्यंत तब्बल १२,५१,२५९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही अधिकृत माहिती दिली आहे. एकूण ८.८७ लाख विद्यार्थी अंतिम फेरीत पात्र ठरले.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८,८७,२६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील ‘भाग-१’ (नोंदणी) आणि ‘भाग-२’ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) पूर्ण करून आपला सहभाग अंतिमतः नोंदवला होता. या पात्र विद्यार्थ्यांपैकी पहिल्या फेरीमध्ये ३१ मे २०२६ पर्यंत एकूण १,७१,५४५ विद्यार्थ्यांनी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले आहेत. यामध्ये केंद्रीय पद्धतीअंतर्गत (कॅप) १,५५,९५१ विद्यार्थ्यांनी, तर व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत (कोटा प्रवेश) १५,५९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

पुणे विभाग राज्यात अव्वल तर…

विभागनिहाय आकडेवारीचा विचार केला असता, पुणे विभागाने प्रवेश निश्चितीमध्ये राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. पुणे विभागात सर्वाधिक ३५,७०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ मुंबई विभागात २४,५६३ आणि नागपूर विभागात २४,४१९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. लातूर विभागात सर्वात कमी म्हणजेच १०,१४३ प्रवेशांची नोंद झाली आहे.

सर्व आठ विभागांमधील एकूण (कॅप + कोटा) प्रवेशांचा तपशील पुढीलप्रमाणे…

  • पुणे : ३५,७०७ प्रवेश
  • मुंबई : २४,५६३ प्रवेश
  • नागपूर : २४,४१९ प्रवेश
  • नाशिक : २१,३७० प्रवेश
  • कोल्हापूर : २०,३०८ प्रवेश
  • अमरावती : १८,२२६ प्रवेश
  • छत्रपती संभाजीनगर : १६,८०९ प्रवेश
  • लातूर : १०,१४३ प्रवेश

उर्वरित विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत मुदत

शिक्षण संचालनालयाने अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालये आवंटित झाली आहेत, त्यांनी ०३ जून २०२६ पर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपले प्रवेश निश्चित करावेत. विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या अंतिम मुदतीची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टल https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी. काही अडचण असल्यास support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर किंवा हेल्पलाइन क्रमांक ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.