नागपूर : दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते १८ फेब्रुवारीला भारतात आणले जाणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर आता ही दुसरी तुकडी भारतात दाखल होणार आहे.
कुनो अभयारण्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) जे. एस. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकी चित्त्यांची दुसरी तुकडी ग्वाल्हेर येथे हवाईमार्गे आणण्यात येईल. त्यानंतर त्यांना कुनो येथे आणले जाईल. या १२ चित्त्यांमध्ये नर आणि माद्यांची संख्या नेमकी किती आहे, हे स्पष्ट झालेले नाही. आफ्रिकी चित्त्यांना येथील वातावरणात रुळण्यासाठी महिनाभर विलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या करारानुसार १२ चित्त्यांची ही तुकडी भारतात दाखल होणार आहे. या चित्त्यांसाठी विलगीकरणातील दहा ‘बोमा’ (बंदिस्त भाग) तयार केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी आपल्या ७२ व्या वाढदिवशी नामिबियातून आणलेल्या पाच मादी आणि तीन नर अशा आठ चित्त्यांची पहिली तुकडी कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडली होती. हे चित्ते अभयारण्याच्या विस्तीर्ण परंतु बंदिस्त भागात शिकार करत आहेत.
‘फिटनेस’बाबत प्रश्नचिन्ह
विविध कारणांमुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सामंजस्य करार होण्यास विलंब झाला. परंतु दक्षिण आफ्रिकेत १५ जुलै २०२२पासून हे चित्ते विलगीकरणात आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल काही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. दीर्घ विलगीकरणामुळे या चित्त्यांच्या ‘फिटनेस’वर दुष्परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.