गोंदिया जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रम शाळेतील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींना एकाच ट्रकमध्ये कोंबल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, एकोडी येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

हेही वाचा- अमरावतीच्‍या जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयात आग; धुरामुळे चिमुकल्‍यांची प्रकृती गंभीर

श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध पडले

हे १२० विद्यार्थी गोंदिया तालुक्यातील शासकीय आदिवासी शाळा, मजितपूर येथील आहेत. या सर्वांना तिरोडा तालुक्यातील कोयलारी आश्रम शाळेत खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नेण्यात आले होते. तिथून रात्री उशिरा परत येत असताना हा प्रकार घडला. श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि ट्रकमध्ये गोंधळ उडाला. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. तीन मुलींना उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आश्रम शाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खरंतर आश्रम शाळा प्रशासनाने त्यांना ने-आन करण्याकरिता इतर सोईस्कर साधनाची व्यवस्था करायला हवी होती. त्यांना ट्रकमध्ये कोंबून नेण्यापूर्वी विचार करायला हवा होता, असे बोलले जात आहे. याप्रकरणी संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- मुले चोरीच्या अफवेमुळे नाथजोगी व भटक्या समाजात अस्वस्थता; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

दोषींवर विभागीय कारवाई करण्यात येणार

या प्रकरणात प्राथमिक दृष्ट्या शाळेचे मुख्याध्यापक दोषी दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरिता त्यांनी तीन-चार बसेसची व्यवस्था करायला हवी होती. ट्रक हा पर्याय असूच शकत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याचे देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचलवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा- परभणी : सेलू तालुक्यातील चार मुले बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले चौकशीचे आदेश

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक निलंबित

मजितपूर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या देखरेखीत दिरंगाई व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्याध्यापक शरद के. थूलकर व क्रीडा शिक्षक एन.टी.लिल्हारे यांना निलंबित करण्यात आले आहे.