चंद्रपूर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे संरक्षण करण्यासाठी कुंपणात अवैध विद्युत प्रवाह साेडल्यामुळे २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२ शेतकऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हयात शेतकऱ्यांमार्फत जंगली प्राण्यांपासून शेती व पिक चे संरक्षणार्थं शेती कुपणास अवैध विद्युत तारेची जोडणी करुन विद्युत प्रवाह सोडल्यामुळे अनेक शेतकरी, गुराखी आणि प्रसंगी स्वतः शेत मालकास विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. चंद्रपूर जिल्हयात २०२२ ते माहे ऑगष्ट २०२३ या कालावधीत शेत मालकाच्या अवैध विद्युत प्रवाह हलगर्जीपणा, गैरवापरामुळे एकुण १३ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा… गोंडवाना विद्यापीठाचा निकाल धक्कादायक! ७४ हजार विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण
याप्रकरणी संबंधित विद्युत प्रवाह सोडणाऱ्या शेत मालकांविरुध्द कलम “सदोष मनुष्य वध” गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन ज्यात आजन्म कारावासाची सुध्दा शिक्षा होवु शकते. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुध्दा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जंगली प्राण्यापासुन शेती व पिकाची सुरक्षिततेकरीता शेती कुंपणाला विद्युत प्रवाह तार जोडुन जिवंत विद्युत प्रवाह सोडु नये, अन्यथा संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी दिला आहे.