* सीसीटीव्ही कॅमेरे सुरू * २१ जागी प्रायोगिक तत्त्वावर अंमल 

* ७०० ठिकाणी ३ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेरे

उपराजधानी नागपूर आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असून शहरातील ७०० ठिकाणी ३ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यापैकी १३० कॅमेरे सुरू झाले असून २१ कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर काम करीत आहेत. आता वाहन चालवताना नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वाहनांच्या क्रमांकावरून घरी थेट चालान येईल.

शहराचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास होत असून सर्वत्र सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. त्याशिवाय मेट्रोचे बांधकाम प्रगतिपथावर असून काही दिवसांमध्ये मेट्रो धावायलाही लागणार आहे. शहराच्या विकासासोबत नागरी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि आणि वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर येते. सध्या पोलीस रस्त्यांवर उभे राहून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करतात. अनेकदा पोलीस आणि वाहन चालकांमध्ये वाद उद्भवतो आणि त्याचे पर्यवसान भांडण, धक्काबुक्की व मारहाणीत होते. त्यामुळे पोलिसांवर अनेक प्रकारचे आरोप केले जातात. अशावेळी खरी परिस्थिती काय आहे, हे समजण्यास काहीही साधन उपलब्ध नसते.

त्याशिवाय विविध प्रकारचे गुन्हे करून पळून जाणाऱ्या आरोपींचा शोध घेताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने रस्त्यांवरील गुन्हे नियंत्रणात येतील. शिवाय गुन्हे उघड होण्याचे प्रमाण वाढेल आणि नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याची शिस्त लागेल. शहरातील ७०० ठिकाणी ३ हजार ८०० कॅमेरे बसवण्यात आले असून १३० कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत, तर २१ ठिकाणच्या कॅमेऱ्यांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या चौकातील कॅमेऱ्यांची अंमलबजावणी सुरू

व्हीएनआयटी चौक, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर चौक, हिंदुस्तान कॉलनी, सावरकरनगर चौक, अयाचित मंदिर, सक्करदरा उड्डाणपूल चौक, मोहम्मद रफी चौक, आनंदनगर सदर, दारोळकर चौक, भरतवाडा वाय-पॉईंट, महावीर उद्यान, काँग्रेसनगर, एफसीआय गोदाम, मेहंदीबाग, टिमकी तीन खंबा, जादूमहल चौक, राजकमल चौक, जयभीम चौक, हिवरीनगर आणि विमा रुग्णालय चौक येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

महापालिकेच्या कक्षातून अंमलबजावणी

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण कक्ष महापालिका आणि नागपूर पोलीस नियंत्रण कक्षात असणार आहे. मात्र, पोलीस नियंत्रण कक्षातील सुविधा निर्माण करण्यास विलंब आहे. शहरातील अनेक कॅमेरे सुरू करण्यात आले असून काहींची अंमलबजावणी सुरू झाली आहे. १५ ऑक्टोबरनंतर सर्व कॅमेरे सुरू होतील. त्यामुळे सध्या महापालिकेच्या नियंत्रण कक्षात पोलीस बसतील आणि कारवाई करतील. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक गुन्ह्य़ांवर नियंत्रण मिळवता येईल. शिवाय रस्त्यांवरील पोलिसांची नागरिकांशी असलेल्या वागणुकीवरही लक्ष असेल. त्यामुळे पोलिसांवर खोटे आरोप करता येणार नाही.

– शिवाजी बोडखे, सहपोलीस आयुक्त.