नागपूर : मंगळवारी झालेल्या मृत्यू विश्लेषण बैठकीत १५ रुग्णांच्या मृत्यूला स्वाईन फ्लू कारणीभूत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. सोबतच जिल्ह्यात २४ तासांत आणखी १५ नवीन स्वाईन फ्लूग्रस्त आढळले. त्यामुळे आजपर्यंतची मृत्यूसंख्या २५ रुग्णांवर पोहचली. बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवावर स्वाईन फ्लूचे सावट असल्याचे चित्र आहे.

आरोग्य उपसंचालक कार्यालयात झालेल्या मृत्यू विश्लेषण बैठकीत १६ मृत्यूंची प्रकरणे ठेवली गेली. त्यातील एकाच्या मृत्यूशी स्वाईन फ्लूचा संबंध नसल्याचे निश्चित करत इतर १५ मृत्यूचे कारण स्वाईन फ्लू असल्यावर एकमत झाले. एकूण मृत्यूंमध्ये नागपूर महापालिका हद्दीतील ४, नागपूर ग्रामीणमधील ३ (कामठी, कळमेश्वर, नरखेड येथील प्रत्येकी १), राज्यातील इतर जिल्ह्यातील ३ (२ भंडारा, १ चंद्रपूर, १ यवतमाळ), राज्याबाहेरील ५ (४ रुग्ण छिंदवाडा, १ शिवनी) अशा एकूण १५ मृत्यूंचा समावेश आहे.

हेही वाचा : अकोला : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महागड्या विजेचे विघ्न

नवीन मृत्यूंमुळे शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या १०, नागपूर ग्रामीण ४, राज्यातील इतर जिल्हे व शेजारील राज्यातील ११ अशी एकूण २५ रुग्णांवर पोहचली आहे. दिवसभरात शहरात ८, नागपूर ग्रामीणला ४, जिल्ह्याबाहेरील ३ असे एकूण १५ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या २२२, ग्रामीण ७१, जिल्ह्याबाहेरील ११५ अशी एकूण ४०८ रुग्णांवर पोहचली आहे. आजपर्यंत यशस्वी उपचाराने शहरात १३४, ग्रामीणला ३३ आणि जिल्ह्याबाहेरील ५५ असे एकूण २२२ जण बरे होऊन घरी परतले. दरम्यान बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या गर्दीत हा आजार वाढण्याचा धोका असल्याने वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार सांगतात.

हेही वाचा : नागपूर : देशात ई-कचऱ्यावरील प्रक्रियेचे प्रमाण नगण्य ; तीन वर्षात दुपटीहून अधिक वाढ

२१ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर

शहरात सध्या ४६, ग्रामीणला ३०, जिल्ह्याबाहेरील ४६ असे एकूण १२२ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी अत्यवस्थ संवर्गातील महापालिका हद्दीतील ९, ग्रामीणचे ६, जिल्ह्याबाहेरील ६ असे एकू २१ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर होते.